पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली कणकवलीत १४ ऑगस्टला भव्य तिरंगा रॅली
👤 तुषार शिंगाडे |
📅
12 August 2026 |
👁 15 Views
कणकवली : देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासाठी आणि राष्ट्रध्वजाबद्दलचा अभिमान जागविण्यासाठी कणकवली विधानसभा मतदारसंघात शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० वाजता कासार्डे ब्रिज येथून या रॅलीला सुरुवात होणार असून, तरळा एसटी स्थानकापर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे. युवा, महिला, माजी सैनिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या अभियानांतर्गत या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी दिली.
या रॅलीमध्ये आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अजित गोगटे, शिवसेना नेते संजय आंग्रे, अभियानाचे जिल्हाप्रमुख संदीप गावडे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा वर्ग, माजी सैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
देशाप्रती प्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रभावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीच्या नियोजनाची जबाबदारी दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, बंड्या नारकर, राजा भुजबळ, सुधीर नकाशे आणि संदीप मेस्त्री यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
राष्ट्रभक्तीच्या या उपक्रमात समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन तिरंग्याला मानवंदना द्यावी आणि राष्ट्रभक्तीचा जागर करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.