ईश्वरपूर : उरुण-ईश्वरपूर नगरपरिषदेच्या स्वच्छता ठेक्याच्या निविदा प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत शिवसेनेच्या वतीने आज मार्केट यार्ड, ईश्वरपूर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. सदर निविदा प्रक्रिया तात्काळ स्थगित करून नव्याने पारदर्शक पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी बोलताना शिवसेनेचे तालुकाप्रमुख सागर मलगुंडे यांनी सांगितले की, नगरपरिषदेच्या स्वच्छता ठेक्यासाठी एकूण नऊ कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. यापैकी सुमारे १६ टक्के कमी दराने निविदा सादर केलेल्या VDK कंपनीला ठेका मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.मात्र, सदर कंपनी परांडा नगरपरिषद आणि महाबळेश्वर नगरपरिषद येथे काळ्या यादीत असल्याचे समजते. त्यामुळे अशा कंपनीला ईश्वरपूर नगरपरिषदेचा स्वच्छता ठेका देणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार ठरू शकतो, असा आरोप मलगुंडे यांनी केला.
सदर कंपनीची पूर्वीची कामगिरी, अनुभव तसेच संबंधित नगरपालिकांमधील तिच्यावरील कारवाई यांची नगरपरिषदेने सखोल व अधिकृत पडताळणी करणे आवश्यक आहे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी घनश्याम जाधव म्हणाले कि कंपनीच्या कामकाजाबाबत कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आमच्याकडे आहे . कर्मचाऱ्यांचे पीएफ वेळेवर न भरणे, आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून न देणे यांसारख्या बाबींचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला.
“नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या स्वच्छता कामाचा ठेका देताना केवळ कमी दर पाहून निर्णय घेऊ नये. संबंधित कंपनीची पात्रता, पूर्वानुभव, कामाची गुणवत्ता आणि तिच्यावरील कारवाई यांची पूर्ण पडताळणी करावी. सर्व बाबींचा विचार करून सदर निविदा प्रक्रिया तात्काळ थांबवावी आणि नव्याने पारदर्शक पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवावी,” अशी ठाम मागणी सागर मलगुंडे यांनी केली. यावेळी वाहतूक सेनेचे घनश्याम जाधव, नगरसेवक सचिन कोळेकर, शहर प्रमुख सतीश पाटील, सनी खराडे योगेश हुबाले, शुभम वीरकर, दिपक पवार आदी उपस्थित होते