सिंधुदुर्गातील फळपीक विमा नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा!
👤 तुषार शिंगाडे |
📅
10 August 2026 |
👁 9 Views
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत तांत्रिक त्रुटी व कागदपत्रांतील अडचणींमुळे नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळवून द्यावा, असे स्पष्ट निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळपीक विमा नुकसानभरपाईच्या प्रश्नासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत सन २०२५-२६ मधील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीस महाराष्ट्राचे कृषी आयुक्त सुरज मांढरे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा कृषी अधिकारी, सीएससीचे व्यवस्थापक वैभव देशपांडे, भारतीय कृषी विमा कंपनीचे व्यवस्थापक अनिल कुंभारे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश सावंत, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
तांत्रिक त्रुटींमुळे शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित ठेवू नका
हवामानातील बदल आणि वाढत्या तापमानामुळे सिंधुदुर्गातील आंबा व काजू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, काही प्रकरणांमध्ये तांत्रिक नोंदी, कागदपत्रे आणि विमा प्रस्तावांमधील त्रुटींमुळे पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही.
अशा सर्व प्रकरणांची तातडीने तपासणी करून त्रुटी दूर कराव्यात. कागदपत्रांतील त्रुटींमुळे काही विमा प्रस्ताव रद्द झाले असल्यास आवश्यक पूर्तता करून ते प्रस्ताव पुन्हा कार्यान्वित करावेत, असे निर्देश मंत्री राणे यांनी दिले.
हवामान केंद्रांच्या तांत्रिक अडचणीही सोडविण्याचे निर्देश
हवामान केंद्रांशी संबंधित तांत्रिक बाबी, महसूल मंडळांच्या नोंदी आणि विमा दाव्यांमधील अडचणी दूर करण्यासाठी कृषी विभाग, महसूल विभाग, विमा कंपनी आणि संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्गातील काही महसूल मंडळांना तांत्रिक नोंदीअभावी आंबा-काजू पिकांच्या नुकसानीचा लाभ मिळाला नसल्याच्या तक्रारींचीही तातडीने दखल घेण्याचे निर्देश देण्यात आले.
आजगाव महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्रातील तांत्रिक त्रुटींमुळे अत्यल्प नुकसानभरपाई मिळाल्याच्या प्रकरणाचीही योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, असे निर्देश मंत्री राणे यांनी दिले.
‘पात्र शेतकऱ्यांना हक्काची भरपाई मिळणार’
“संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तांत्रिक अडचणी शेतकऱ्यांच्या हक्काच्या नुकसानभरपाईच्या आड येऊ दिल्या जाणार नाहीत. पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची भरपाई मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” असे मंत्री नितेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
नुकसानामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, अशा बिकट परिस्थितीत पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याची प्रक्रिया प्राधान्याने आणि गतिमान पद्धतीने पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.