वैभववाडीत जनशताब्दी, नेत्रावती एक्सप्रेसला थांबा द्या : सभापती सिद्धेश रावराणे
👤 तुषार शिंगाडे |
📅
12 August 2026 |
👁 27 Views
वैभववाडी (प्रतिनिधी) :
कोकणचे भाग्यविधाते, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी ही नवीन रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार आहे. या रेल्वेला वैभववाडी येथे थांबा देण्यात आल्याने तालुक्यातील प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. या महत्त्वपूर्ण रेल्वे सेवेसाठी खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी आभार मानले आहेत.
दरम्यान, वैभववाडी रेल्वे स्थानकावर जनशताब्दी एक्सप्रेस आणि नेत्रावती एक्सप्रेस या दोन्ही महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणीही सभापती सिद्धेश रावराणे यांनी केली आहे. या दोन्ही गाड्यांना वैभववाडीत थांबा मिळाल्यास मुंबई, कोकण तसेच राज्यातील अन्य भागांत प्रवास करणाऱ्या तालुक्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवाशांच्या दैनंदिन गरजा आणि तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने रेल्वे सुविधा अधिक सक्षम होणे आवश्यक आहे. त्यामुळे जनशताब्दी आणि नेत्रावती एक्सप्रेसला वैभववाडीत थांबा मिळण्यासाठी संबंधित पातळीवर प्रत्यक्ष पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे, असे रावराणे यांनी स्पष्ट केले.
केवळ सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा करून किंवा श्रेय घेण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष पाठपुरावा करून सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे, असेही सिद्धेश रावराणे यांनी नमूद केले.
वैभववाडी तालुक्यातील प्रवाशांच्या वतीने नवीन रेल्वे सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आभार व्यक्त केले.