मालवणी खाद्यसंस्कृतीतील पारंपरिक पदार्थांना आधुनिक विपणनाची जोड देत महिला बचत गटांनी स्वतःचा स्वतंत्र ब्रँड निर्माण करावा. स्थानिक खाद्यपदार्थांना व्यावसायिक स्वरूप दिल्यास महिला उद्योजकतेला मोठी चालना मिळेल, असे आवाहन कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.
कणकवली येथील चौंडेश्वरी सभागृहात ‘हिरकणी लोकसंचालित साधन केंद्रा’च्या १६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष संदेश पारकर बोलत होते.
महिला आर्थिक विकास महामंडळ, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पंचायत समिती सभापती हर्षवर्धन वाळके, पंचायत समिती सदस्य बाबलू सावंत, तालुक्यातील महिला उद्योजिका तसेच विविध बचत गटांच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन
कार्यक्रमात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली. जिल्हा उद्योग केंद्राच्या उद्योग निरीक्षक मिरशी गेंडे यांनी उद्योग विभागाच्या विविध योजना व उद्योग उभारणीबाबत मार्गदर्शन केले.
बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक अर्जुन सर यांनी बँकिंग सुविधा, कर्ज योजना व उपलब्ध आर्थिक सहाय्याबाबत माहिती दिली. तर तालुका कृषी अधिकारी विनायक पाटील यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देत महिला शेतकरी व उद्योजिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
‘पुरुष सुधारक सन्मान’ पुरस्काराने गौरव
महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत पुरुषांचा सकारात्मक सहभागही महत्त्वाचा आहे, हा संदेश देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘पुरुष सुधारक सन्मान’ या अभिनव उपक्रमांतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
‘सिंधू कृषी महिला शेतकरी उत्पादक कंपनी’च्या अहवालाचे प्रकाशन
कार्यक्रमादरम्यान ‘सिंधू कृषी महिला शेतकरी उत्पादक कंपनी’च्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना कायमस्वरूपी व शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी मान्यवरांनी दिले.
दरम्यान, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी अमरीश मिरझे यांनी मागील वर्षातील कामकाजाचा आढावा सादर केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधन केंद्राच्या व्यवस्थापक सीमा गावडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लेखापाल आराध्या परब, विकास सल्लागार अथर्व मेस्त्री तसेच इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.