एक पेड माँ के नाम' उपक्रमातून मुणगे भगवती हायस्कूलचा पर्यावरण संवर्धनाचा आदर्श
स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात म्हणजेच २०४७ मध्ये भारत हा विकसित राष्ट्र म्हणून जगात अग्रक्रमावर असेल. त्या विकसित भारताच्या निर्मितीत आजची विद्यार्थी पिढी मोलाची भूमिका बजावणार आहे. पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणे ही काळाची गरज असून, आज लावलेली ही झाडे आणि त्यांचे जतन करणारे विद्यार्थीच उद्याच्या विकसित भारताचे खरे शिल्पकार ठरतील," असा विश्वास भगवती हायस्कूल, मुणगेचे सेवानिवृत्त शिक्षक संजय बांबुळकर यांनी व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'एक पेड माँ के नाम' या देशव्यापी उपक्रमांतर्गत भगवती हायस्कूल, मुणगे येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ संजय बांबुळकर यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमास संस्थेचे संचालक वसंत शेट्ये, निलेश परुळेकर, नंदकुमार बागवे, हरिदास महाले, मुख्याध्यापक कुंज, तसेच संतोष लब्दे, स्वप्नील कांदळगावकर, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय बांबुळकर म्हणाले की, पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाला तितकेच महत्त्व असून, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावागावांत पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी भगीरथ प्रतिष्ठानचे प्रसाद देवधर यांचे विशेष सहकार्य लाभल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.
शाळेचा परिसर कातळी भागात असल्याने येथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून तरळे (कोल्हापूर) येथे कार्यरत वन विभागातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले. त्यानुसार स्थानिक हवामानाला पूरक अशा वड, जांभूळ, आंबा, मुचकुंद, बकुळ आदी सुमारे दहा ते बारा प्रकारच्या वृक्षांची निवड करून त्यांची लागवड करण्यात आली. भविष्यात हा परिसर समृद्ध, हिरवागार आणि पर्यावरणपूरक व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.
लावण्यात आलेल्या प्रत्येक वृक्षाच्या संरक्षणासाठी शाळेच्या आवारात १२ चिरेबंदी संरक्षक (पार) रचना उभारण्यात आल्या आहेत. तसेच पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांवर प्रत्येक झाडाच्या संगोपनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियमित पाणी देणे, स्वच्छता राखणे आणि झाडांची वाढ लक्षात ठेवणे, अशी जबाबदारी विद्यार्थी पार पाडणार आहेत.
"आज लावलेली ही झाडे उद्या मोठी झाल्यावर त्यांची सावली आणि फळे अनेक पिढ्यांना लाभतील. भविष्यात हेच विद्यार्थी विविध क्षेत्रांत अधिकारी, शास्त्रज्ञ, शिक्षक किंवा जबाबदार नागरिक बनल्यानंतर 'ही झाडे आम्ही शाळेत असताना लावली होती,' असे अभिमानाने सांगतील. विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गप्रेम, पर्यावरणाबद्दलची जबाबदारी आणि समाजाप्रती कर्तव्याची भावना निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे," असेही संजय बांबुळकर यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमामुळे शाळा परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून, 'एक पेड माँ के नाम' हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी हरित संस्कारांची नवी सुरुवात ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.