विद्यार्थ्यांच्या ‘रानभाज्या बाजाराला’ ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 06 August 2026 | 👁 1 Views
विद्यार्थ्यांच्या ‘रानभाज्या बाजाराला’ ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जि. प. शाळा मिठबाव क्र. १ चा अभिनव उपक्रम; एका दिवसात ₹७,४५० ची उलाढाल
विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, आर्थिक व्यवहाराचे ज्ञान, संवादकौशल्य तसेच स्थानिक रानभाज्यांचे महत्त्व रुजविण्याच्या उद्देशाने जि. प. शाळा मिठबाव क्र. १ येथे आयोजित करण्यात आलेल्या 'रानभाज्या प्रदर्शन व रानभाज्या बाजार' या अभिनव उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी स्वतः गोळा करून मांडलेल्या विविध रानभाज्यांच्या विक्रीतून एकूण ₹७,४५० रुपयांची उलाढाल झाली.

या उपक्रमाला उपसभापती श्री. अमोल लोके, सरपंच श्री. भाई नरे, उपसरपंच श्रीमती निवेदिता फाटक, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती भाग्यश्री मेस्त्री, केंद्रप्रमुख जगदीश शिंदे, मुख्याध्यापक राजेश्वर मुगांवकर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती सपना वायंगणकर, उपाध्यक्ष श्री. संदीप खेडेकर यांच्यासह ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची आकर्षक मांडणी करून त्यांच्या उपयोगांची माहितीही अभ्यागतांना दिली. विद्यार्थ्यांनीच ग्राहकांशी संवाद साधत विक्रीची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे त्यांना व्यवहारज्ञान, आत्मविश्वास आणि उद्योजकतेचे प्रत्यक्ष धडे मिळाले.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांकडून रानभाज्यांची खरेदी करून त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले. तसेच अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा, आर्थिक साक्षरता आणि निसर्गाविषयीची जाणीव विकसित होत असल्याचे सांगत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे विशेष कौतुक केले.
ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहाने रानभाज्या खरेदी करून विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. स्थानिक व पारंपरिक अन्नसंस्कृतीचे जतन करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देणारा हा उपक्रम सर्वांच्या पसंतीस उतरला.
शैक्षणिक उपक्रमाला व्यवहाराची जोड देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आदर्श घालून देणाऱ्या जि. प. शाळा मिठबाव क्र. १ च्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे परिसरात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
गटशेती ही सामाजिक चळवळ व्हायला हवी : डॉ. अविनाश पोळ | बचतगटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण --दिपक सुर्वे | बाबू खरात यांची सभापती सिद्धेश (बंटी)रावराणे यांनी घेतली भेट | विद्यार्थ्यांच्या ‘रानभाज्या बाजाराला’ ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद | हरित संस्कारातून घडणार विकसित भारताची पिढी | आकांक्षीत तालुका निती आयोगाच्या डेल्टा रेकिंग मध्ये अक्कलकोट तालुक्याची गरुड झेप राज्यात तिसरा क्रमांक | ईश्वरपूरमध्ये पाण्याच्या मीटरची धडाधड चोरी! 4-5 दिवसात मोठा प्रकार, नागरिक त्रस्त | महात्मा फुले योजनेतील 15,407 संशयास्पद दाव्यांची SIT चौकशी होणार ! | पर्ल्स (PACL) गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे अपडेट | कागदी रेशनकार्ड 15 ऑगस्टपासून बंद! |