वैभववाडी बसस्थानकाच्या समस्यांवर जि प सदस्य प्रमोद रावराणे आक्रमक विभागीय नियंत्रकांना निवेदन; १८ ऑगस्टला प्रत्यक्ष पाहणीचे आश्वासन
👤 तुषार शिंगाडे |
📅
13 August 2026 |
👁 6 Views
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील एसटी बसस्थानकाची दुरवस्था, विद्यार्थ्यांची गैरसोय आणि प्रवाशांच्या प्रलंबित समस्यांबाबत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सदस्य प्रमोद पुंडलिक रावराणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या समस्यांकडे तातडीने लक्ष वेधण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक श्री. घोडे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत झालेल्या या भेटीत वैभववाडी बसस्थानकातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. निवेदनाची गंभीर दखल घेत विभागीय नियंत्रकांनी मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता वैभववाडी बसस्थानकाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याचे मान्य केले आहे.
बसस्थानकाच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष
वैभववाडी बसस्थानकाच्या सुसज्ज इमारतीचे बांधकाम तातडीने सुरू करावे, बसस्थानकासाठी दोन कंट्रोलर पदे मंजूर करावीत, प्रवाशांसाठी शौचालय व स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी आणि स्थानक परिसराच्या स्वच्छतेसाठी सफाई कामगारांची नियुक्ती करावी, अशा प्रमुख मागण्या रावराणे यांनी केल्या आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणीही करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या गैरसोयीवर नाराजी
वैभववाडी तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी मानव विकास योजनेअंतर्गत सात एसटी गाड्या मंजूर आहेत. मात्र, या गाड्यांचा वापर इतर प्रवासी वाहतुकीसाठी होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या सातही गाड्या केवळ विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे वापरण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच विद्यार्थ्यांचे एसटी पास शाळेतच उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना बसस्थानकात येण्याची आवश्यकता भासणार नाही, अशी मागणीही करण्यात आली आहे.
फेऱ्या रद्द करण्याचा प्रकार थांबविण्याची मागणी
जांभवडे, उपळे, दिगशी, भुईबावडा, कुर्ली आदी गावांकडे रात्री जाणाऱ्या गाड्या वेळेवर सोडल्या जात नाहीत किंवा अचानक रद्द केल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. काही गाड्यांमधून विद्यार्थी व प्रवाशांना अर्धवट प्रवासात उतरविले जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वाहक व चालकांकडून प्रवाशांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी असून, त्याबाबत तक्रारवहीत नोंदी असल्याचा दावा रावराणे यांनी केला आहे. या सर्व प्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच वाहक व चालकांना दुबार ड्युटी लावू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
बंद फेऱ्या पुन्हा सुरू करण्याची मागणी
कोरोना काळापासून बंद असलेल्या स्थानिक तसेच लांब पल्ल्याच्या एसटी फेऱ्या पूर्ववत सुरू करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. यामध्ये कणकवली-फोंडा-वैभववाडी-भुईबावडा-पाचल-कुरुंदवाड-पणजी, वैभववाडी-परळ, कुर्ली-सडुरे-वैभववाडी-खारेपाटण-भुईबावडा-कोल्हापूर, गगनबावडा-भुईबावडा-पाचल-बोरीवली आणि वैभववाडी-नायदे-कातकरवाडी-दिगशी-तिथवली या मार्गांचा समावेश आहे.
याशिवाय खारेपाटण-भुईबावडा-कुरुंदवाड आणि अक्कलकोट या दोन नव्या एसटी गाड्या सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
खासगी वाहनांना बंदीची मागणी
वैभववाडी बसस्थानक परिसरात खासगी वाहनांची वाढती वर्दळ रोखण्यासाठी स्थानक परिसरात खासगी वाहनांना बंदी घालावी, तसेच बंद असलेली बस आरक्षण व्यवस्था तातडीने पूर्ववत करावी, अशी मागणीही रावराणे यांनी केली आहे.
या निवेदनाची प्रत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनाही पाठविण्यात आली आहे. १८ ऑगस्ट रोजी विभागीय नियंत्रक वैभववाडी बसस्थानकाची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याने, या पाहणीनंतर प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते, याकडे प्रवासी, विद्यार्थी आणि संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.