सागरी कासव संरक्षणासह कोळंबी निर्यातीला चालना; ट्रॉलरवर TED बसविणे बंधनकारक
👤 तुषार शिंगाडे |
📅
12 August 2026 |
👁 175 Views
देवगड, दि. १२ ऑगस्ट २०२६ (प्रतिनिधी) : येत्या १६ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मासेमारी हंगामाच्या पार्श्वभूमीवर देवगड येथे ट्रॉलरच्या जाळ्यांमध्ये TED (Turtle Excluder Device – कासव बहिर्गमन साधन) बसविण्याबाबत जनजागृती तसेच फिटमेंट प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. शासनाकडून सर्व ट्रॉलर नौकाधारकांना TED चे निशुल्क वाटप करण्यात येत आहे.
अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना TED बसविण्याचे महत्त्व स्पष्ट केले. सागरी कासवांचे संरक्षण करण्याबरोबरच भारतीय जंगली कोळंबीला आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय निकषांची पूर्तता करून विशेषतः अमेरिकेसारख्या महत्त्वाच्या निर्यात बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी TED महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
कंपनीमार्फत आलेले तज्ज्ञ गोपीनाथ व त्यांच्या सहकाऱ्यांनी ट्रॉलरच्या जाळ्यामध्ये TED कशा पद्धतीने बसवायचे, याचे सविस्तर प्रात्यक्षिक मच्छिमारांना करून दाखविले. यावेळी आनंदवाडी येथील नौकामालक व तांडेल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवगड मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष द्वजिकांत कोयंडे, देवदुर्ग संस्थेचे सचिव कृष्णा परब तसेच परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या हस्ते ट्रॉलरधारकांना TED चे वाटप करण्यात आले. सागरी सुरक्षा रक्षक व सागर मित्र यांनी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन व्यवस्थित पार पाडले.
कासवांसह सागरी जीवांचे संरक्षण
ट्रॉलिंगदरम्यान कासवे तसेच इतर मोठे सागरी प्राणी अपघाताने जाळ्यात अडकण्याची शक्यता असते. TED मुळे अशा प्राण्यांना जाळ्यातून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळतो. केंद्र शासनाच्या सागरी मत्स्यव्यवसाय मार्गदर्शक तत्त्वांमध्येही ट्रॉल जाळ्याच्या कोड-एंडमध्ये TED बसविण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
अमेरिकन बाजारपेठेसाठी TED ठरणार महत्त्वाचे
भारताच्या समुद्री उत्पादन निर्यातीमध्ये कोळंबीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारतातून ७,४१,५२९ मेट्रिक टन गोठविलेल्या कोळंबीची निर्यात झाली असून त्यातून सुमारे ४३,३३४ कोटी रुपये म्हणजेच ५.१७७ अब्ज डॉलर इतके उत्पन्न मिळाले. अमेरिका हा भारतीय कोळंबीचा प्रमुख आयातदार आहे.
अमेरिकेच्या Public Law 101-162 मधील कलम 609 नुसार जंगली कोळंबी कासवांना हानी न पोहोचविणाऱ्या पद्धतीने पकडलेली असणे आवश्यक आहे. त्यामुळे TED चा वापर आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी भारतीय कोळंबीच्या निर्यातीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
शाश्वत मत्स्यव्यवसायाला चालना
TED मुळे अनावश्यक by-catch कमी होण्यास मदत होते. परिणामी सागरी परिसंस्थेचे संतुलन राखण्यास तसेच शाश्वत मत्स्यव्यवसायाला चालना मिळते. देवगडमध्ये राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे मच्छिमारांमध्ये TED वापराबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली असून, भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कोळंबीला अधिक संधी मिळण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.