केसरेकर दाम्पत्याच्या मुलांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले शैक्षणिक पालकत्व मुलांची भेट घेऊन केले सांत्वन; शिक्षण व वसतिगृहाचा खर्च करण्याची घेतली जबाबदारी
👤 संतोष एडके तासगाव |
📅
24 August 2026 |
👁 75 Views
कुपवाड येथील दुहेरी हत्याकांडात मृत्यू झालेल्या केसरेकर दाम्पत्याच्या दोन्ही मुलांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी मुलांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. दुःखाच्या या प्रसंगी शासन व प्रशासन मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
केसरेकर दाम्पत्याच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी जाहीर केले. तसेच मुलांना आष्टा येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलात ठेवून त्यांच्या वसतिगृहाचा खर्चही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुलांच्या शैक्षणिक व अन्य आवश्यक खर्चासाठी त्यांच्या बँक खात्यात तातडीने एक लाख रुपये जमा करण्यात येणार असून, यापुढेही गरजेनुसार त्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा केली जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, महानगरपालिका सभागृह नेते संदीप आवटी, उपमहापौर गजानन मगदूम, नगरसेवक विष्णू माने आदी उपस्थित होते.
दोषींवर १५ दिवसांत चार्जशीट दाखल करण्याच्या सूचना
केसरेकर दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी दोषींवर १५ दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याशी चर्चा करून हे प्रकरण नियमितपणे चालवून दोषींना लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
दरम्यान, महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनीही केसरेकर दाम्पत्याच्या मुलांना सामूहिकरित्या आर्थिक मदत करण्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचे यावेळी सांगितले. त्यामुळे या दुःखद प्रसंगात मुलांच्या शिक्षणासह त्यांच्या भविष्यासाठी शासन, प्रशासन आणि स्थानिक पदाधिकारी एकत्रितपणे मदतीसाठी पुढे आले आहेत.