शक्तीपीठविरोधात सांगलीत शेतकऱ्यांचा महासंग्राम; नेत्यांची एकजूट, सरकारविरोधात रणशिंग
👤 संतोष एडके तासगाव |
📅
21 August 2026 |
👁 5 Views
सांगली शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (२१ ऑगस्ट) सांगलीत शक्तीपीठविरोधी समितीच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. क्रांतिसिंह नाना चौकातून सुरू झालेल्या या मोर्चात सांगली जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतून शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणारे शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. घोषणांनी परिसर दणाणून सोडत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजीत कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, रासपचे नेते महादेव जानकर, कॉ. धनाजी गुरव यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाला राजकीय पक्षांसह शेतकरी संघटनांचा व्यापक पाठिंबा असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली. “शक्तीपीठचा घाट या सरकारने घातला आहे. निवडणुकीच्या वेळी शक्तीपीठ रद्द करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र ते केवळ निवडणुकीपुरतेच होते,” असा आरोप त्यांनी केला.
“रत्नागिरी मार्ग उपलब्ध आहे. त्या मार्गावरून जाण्यासाठी माणसे नाहीत. मग शक्तीपीठ महामार्गाचा घाट कशासाठी घातला जात आहे?” असा सवाल करत बारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला स्पष्ट संदेश असल्याचे त्यांनी सांगितले.
महामार्गासाठी प्रस्तावित प्रचंड खर्चावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “पैसे जास्त झाले असतील तर ५००-५०० कोटी रुपये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी द्या. एक लाख दहा हजार कोटी रुपये खर्च करण्याचा प्रश्न असेल तर हे पैसे कसे खर्च करायचे, ते आम्हाला सांगा,” असे ते म्हणाले.
“कुणाला तरी कॉन्ट्रॅक्ट मिळावे म्हणून या रस्त्याचा घाट सुरू आहे,” असा आरोपही त्यांनी केला. जमीन संपादनाच्या प्रक्रियेत दलाली आणि कमिशनचा प्रकार होण्याची शक्यता असल्याचा दावा करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला.
‘सरकारचा अतिरेक परतवून लावू’ : जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आंदोलनाला आक्रमक दिशा देत सरकारला थेट इशारा दिला.
“शक्तीपीठविरोधात एकसंधपणे सरकारचा अतिरेक परतवून लावूया. विरोध मोडून काढण्यासाठी सरकारने खास अधिकारी या जिल्ह्यात पाठवले आहेत; मात्र आपणही तेवढ्याच ताकदीने उभे आहोत,” असे ते म्हणाले.
“हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. क्रांतिसिंह नाना पाटलांचे नाव घेऊन आपण या लढ्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात हा लढा ताकदीने लढला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
‘सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत; मग टेंडर कशासाठी?’
राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा दाखला देत जयंत पाटील यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“कंत्राटदारांची तब्बल ९० हजार कोटी रुपयांची देणी सरकारने भागवलेली नाहीत. मागील वर्षी केलेल्या आमदार निधीतील कामांचे पैसे अद्याप आलेले नाहीत. नवीन आमदार निधीही आलेला नाही. सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. बाहेरून कर्ज काढायचे आणि दुसरीकडे मोठ्या रस्त्यांच्या टेंडरचा उद्योग सुरू ठेवायचा, हे सरकारने तातडीने थांबवले पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.