कुपवाड दुहेरी हत्याकांडाचा निषेध ; सांगली बंद मोर्चातून आरोपीला फाशीची मागणी

👤 संतोष एडके तासगाव | 📅 21 August 2026 | 👁 5 Views
कुपवाड दुहेरी हत्याकांडाचा निषेध ; सांगली  बंद मोर्चातून आरोपीला फाशीची मागणी


सांगली : कुपवाड येथील विघ्नहर्ता कॉलनीमध्ये किरकोळ वादातून मोहन केसरेकर आणि मनीषा केसरेकर या दांपत्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (२१ ऑगस्ट) सकल हिंदू समाजातर्फे सांगली, मिरज आणि कुपवाड परिसरात बंद पाळण्यात आला. या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सांगली महापालिकेपर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चात नागरिक, विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, राजकीय नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
१५ ऑगस्ट रोजी कुपवाड येथील विघ्नहर्ता कॉलनीमध्ये कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला होता. या वादाचे पर्यवसान गंभीर हल्ल्यात झाले. आरोपी फरीद शेख याने मोहन आणि मनीषा केसरेकर यांच्यावर हातोडा व सुरीने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते.
उपचारादरम्यान मनीषा केसरेकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या मोहन केसरेकर यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान १८ ऑगस्ट रोजी त्यांचाही मृत्यू झाला. अवघ्या काही दिवसांच्या अंतराने दांपत्याचा मृत्यू झाल्याने सांगली-कुपवाड परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी फरीद शेख याला अटक केली आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने आंदोलनाची हाक दिली. त्यानुसार शुक्रवारी सांगली, मिरज आणि कुपवाड परिसरात बंद पाळण्यात आला. विविध भागांतील नागरिकांनी बंदला प्रतिसाद दिला.
‘आरोपीला फाशी द्या’च्या घोषणा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या मोर्चात सहभागी नागरिकांनी ‘केसरेकर कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे’, ‘आरोपीला फाशी झाली पाहिजे’, अशा घोषणा देत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. मोर्चेकरी सांगली महापालिका परिसरात एकत्र आल्यानंतर प्रशासनासमोर विविध मागण्या मांडण्यात आल्या.
मृत दांपत्याच्या नातेवाईकांनीही या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला. आरोपी फरीद शेख याचा एन्काऊंटर करावा, अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांना एन्काऊंटर करणे शक्य नसल्यास आरोपीला जनतेच्या ताब्यात द्यावे, अशी उद्विग्न मागणीही नातेवाईकांनी केली. आरोपीवर कोणतीही दया न दाखवता कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी त्यांची मागणी होती.
जलदगती न्यायालयात खटला चालविण्याची मागणी
आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. तसेच या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अॅड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
मृत मोहन आणि मनीषा केसरेकर यांच्या मुलांची जबाबदारी शासनाने घ्यावी. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार असलेल्या त्यांच्या मुलीसह इतर साक्षीदारांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. पीडित कुटुंबाला आर्थिक मदतीसह आवश्यक ती शासकीय मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.
राजकीय नेते, हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग
या मोर्चामध्ये आमदार गोपीचंद पडळकर, भाजप नेत्या नेहा केळकर, पृथ्वीराज पवार, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे नितीन चौगुले यांच्यासह भारतीय जनता पक्ष, शिवसेना तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. सांगली-मिरज-कुपवाड शहर परिसरातील नागरिकांसह कर्नाटकातून आलेले नागरिकही मोर्चात सहभागी झाले.
किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर दुहेरी हत्याकांडात झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, आरोपीविरुद्ध तपास जलदगतीने पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करावे आणि खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाकडे केली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
तासगाव अंनिस शाखेतर्फे वैज्ञानिक दृष्टिकोन दिन साजरा; दाभोलकर हत्येतील सूत्रधारांना शिक्षा करण्याची मागणी | शक्तीपीठविरोधात सांगलीत शेतकऱ्यांचा महासंग्राम; नेत्यांची एकजूट, सरकारविरोधात रणशिंग | कुपवाड दुहेरी हत्याकांडाचा निषेध ; सांगली बंद मोर्चातून आरोपीला फाशीची मागणी | कोळपे मतदारसंघातील साकवांच्या कामांना मंजुरी देऊन निधी द्या; जि.प. सदस्य प्रमोद रावराणे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी | देवगड आनंदवाडी बंदर विकासासाठी ८५ कोटी मंजूर पुढील १८ महिन्यांत सुरक्षित व सुसज्ज बंदर विकसित करणार; मच्छीमारांच्या विकासासह जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढण्याचे सामर्थ्य – मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे | भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी प्रकाश मेस्त्री...!* | सेवा अभियानातून जनतेशी थेट संवाद’; अलिबागमध्ये आमदार प्रमोद जठार, संतोष साखरे यांनी स्वीकारली नागरिकांची निवेदने | छात्रों की गूंज’ला सिंधुदुर्गातून बुलंद पाठिंबा; कणकवलीत काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांची माहिती | देवगडमध्ये यंदापासून बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय सुरू ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची नवी संधी; आमदार प्रमोदजी जठार यांच्या प्रयत्नांना यश | मिरज-पंढरपूर महामार्गावर ३०० किलो गांजा जप्त; १ कोटी ७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत |