माण तालुक्यातील पळसवाडे येथील श्री. नानासो रामहरी यादव यांनी सामाईक विहिरीवरील अतिक्रमण तात्काळ हटविण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
उपोषणकर्त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, संबंधित सामाईक विहीर काटक्या, झुडपे व माती टाकून बुजविण्यात आली असून ती तात्काळ मोकळी करून मिळावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच विहिरीवरील ५ एचपी मोटार, सुमारे १०० फूट काळा गोटा पाईप आणि स्टार्टर चोरीला गेल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी गुन्हा नोंदवून पंचनामा करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय जेसीबीच्या सहाय्याने विहीर बुजविण्यात आल्याचा आरोप करत, संबंधित माहिती देणारे व्यक्ती, जेसीबी चालक व मालक यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
जोपर्यंत मागण्यांवर प्रशासनाकडून ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा उपोषणकर्ते श्री. नानासो रामहरी यादव यांनी दिला आहे. प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.