ग्रामीण मातीतला ओम आज ‘टीम इंडिया’चा स्टार; व्हॉलीबॉलच्या स्वप्नाला मिळाली आंतरराष्ट्रीय भरारी

👤 गौरव डेंगळे अहिल्यानगर | 📅 03 August 2026 | 👁 68 Views
ग्रामीण मातीतला ओम आज ‘टीम इंडिया’चा स्टार; व्हॉलीबॉलच्या स्वप्नाला मिळाली आंतरराष्ट्रीय भरारी
अहिल्यानगर जिल्ह्याने देशाला दिला व्हॉलीबॉलचा नवा हिरा; AVC कपमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देण्यात मोलाचे योगदान
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या मातीतून घडलेला आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू ओम वसंत लाड याने आपल्या मेहनत, जिद्द, सातत्य आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर भारतीय व्हॉलीबॉलमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. नुकतेच AVC कप 2026 मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत कांस्यपदक पटकावणाऱ्या ओमच्या या यशामुळे महाराष्ट्रासह अहिल्यानगर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळाली आहे.ओमने वयाच्या ११व्या वर्षी व्हॉलीबॉल खेळण्यास सुरुवात केली. आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवीपासून त्याच्या व्हॉलीबॉल प्रवासाला सुरुवात झाली. त्याचे पहिले प्रशिक्षक शशेंद्र त्रिपाठी यांनी त्याच्या खेळातील मूलभूत कौशल्ये विकसित करण्यासोबतच त्याला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.यानंतर ओमने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व सब-ज्युनियर व ज्युनियर राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांमध्ये केले. या स्पर्धांमधून त्याला राष्ट्रीय स्तरावरील अनुभव मिळाला आणि पुढील वाटचालीसाठी आत्मविश्वास निर्माण झाला.पुढे त्याने SRM विद्यापीठ चेन्नई येथे प्रवेश घेत आपला व्हॉलीबॉल प्रवास सुरू ठेवला. प्रशिक्षक दक्षिणामूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षांच्या विद्यापीठीय कारकिर्दीत ओमने सलग तीन वर्षे पदके मिळवली. पहिल्या वर्षी रौप्यपदक, दुसऱ्या वर्षी सुवर्णपदक तर तिसऱ्या वर्षी कांस्यपदक अशी त्याची उल्लेखनीय कामगिरी राहिली.विद्यापीठातील कारकीर्द पूर्ण केल्यानंतर ओमला चेन्नई येथील इंडियन ओव्हरसीज बँकेत नोकरीची संधी मिळाली. नोकरीसोबतच त्याने व्हॉलीबॉलची साधना कायम ठेवली. त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फळ म्हणून २०२६ मध्ये त्याची भारतीय वरिष्ठ व्हॉलीबॉल संघात निवड झाली. भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न साकार करत त्याने AVC कप २०२६ मध्ये भारतीय संघासोबत कांस्यपदक मिळविले.विशेष म्हणजे, जपान येथे सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या संभाव्य २४ खेळाडूंच्या गटातही ओमने स्थान मिळविले आहे. त्यामुळे त्याच्या पुढील वाटचालीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.ओमच्या या यशामागे त्याचे आई-वडील, प्रशिक्षक, सहकारी खेळाडू आणि मार्गदर्शक यांचे मोठे योगदान आहे. शालेय जीवनात व्हॉलीबॉल खेळताना स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे CEO श्री. पार्थ दोशी, पुण्याचे डॉ. संतोष पवार यांच्यासह अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन त्याला लाभले. मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनासोबतच स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्या यशामागे असल्याचे ओम मानतो.दरम्यान, श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव येथील विद्यार्थ्यांशी ओमने ऑनलाइन संवाद साधत आपल्या जीवनप्रवासातील संघर्ष, व्हॉलीबॉलमधील विविध संधी आणि भारतीय संघापर्यंत पोहोचण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्याने खेळाइतकेच शिक्षणालाही महत्त्व आहे, असे स्पष्ट केले. तसेच आपल्या प्रशिक्षकांवर विश्वास ठेवून सातत्याने मेहनत करत राहिल्यास निश्चितच यश मिळते, असा प्रेरणादायी संदेश त्याने विद्यार्थ्यांना दिला.अनेक वर्षांनंतर वरिष्ठ गटात महाराष्ट्रातून भारतीय व्हॉलीबॉल संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवणाऱ्या ओम वसंत लाडच्या रूपाने कर्जत तालुक्याने आणि अहिल्यानगर जिल्ह्याने देशाला व्हॉलीबॉलचा एक गुणवान हिरा दिला आहे. ग्रामीण भागातील खेळाडू योग्य संधी, मार्गदर्शन आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकतो, हे ओमच्या प्रवासाने सिद्ध केले आहे.वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी हातात घेतलेला व्हॉलीबॉल आज त्याला भारतीय संघाच्या जर्सीपर्यंत घेऊन आला आहे. “मेहनत, जिद्द, प्रशिक्षकांवरील विश्वास आणि देशासाठी काहीतरी करण्याची इच्छाशक्ती” या चार गोष्टी ओमच्या यशस्वी प्रवासाची खरी ओळख ठरल्या आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
सामाईक विहिरीवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू | सावळजमध्ये साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप | ग्रामीण मातीतला ओम आज ‘टीम इंडिया’चा स्टार; व्हॉलीबॉलच्या स्वप्नाला मिळाली आंतरराष्ट्रीय भरारी | झरे येथे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न | तासगाव तालुक्यात समन्यायी पाणी वाटपाची गरज; "शेतकऱ्यांना न्याय्य पाणी कधी मिळणार?" – डॉ. भारत पाटणकर | 9 ऑगस्ट ला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आष्टा नगरीत | ऊसतोड कामगाराचा मुलगा ते शिवछत्रपती पुरस्कार विजेता; शंकर गदईंचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर | आचरा गावातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करा; अन्यथा १५ ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा इशारा | मालवण बंदरा येथील पोर्टा केबिनचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन | प्रशासनाने अधिक गतीने काम करत शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात पालकमंत्री नितेश राणे |