मालवण तालुक्यातील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय, वायंगणी या प्रशालेच्या सभोवतालच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या रानगवतामुळे विद्यार्थ्यांमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती निर्माण झाली होती. या समस्येची दखल घेत संस्थेचे अध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने शाळा परिसराची साफसफाई करून एक आदर्श निर्माण केला.
दोन ग्रासकटरच्या साहाय्याने शाळेचा परिसर तसेच सभोवतालचे वाढलेले रान व गवत कापून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमामुळे शाळेला स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित स्वरूप प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांना सरपटणाऱ्या प्राण्यांपासून होणारा संभाव्य धोका कमी होण्यास मोठी मदत झाली आहे.
संस्थाध्यक्ष हनुमंत प्रभू यांच्या या प्रेरणादायी आणि समाजहिताच्या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक, संस्था सदस्य, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनापासून स्वागत करत त्यांचे आभार व्यक्त केले. त्यांच्या या कृतीमुळे सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण समाजासमोर उभे राहिले आहे.