पंढरीच्या वारीत 'मुक्या' जीवांची अनोखी विठ्ठल सेवा

👤 आशुतोष फसाले | 📅 29 July 2026 | 👁 57 Views
पंढरीच्या वारीत 'मुक्या' जीवांची अनोखी विठ्ठल सेवा
पंढरीच्या वारीत 'मुक्या' जीवांची अनोखी विठ्ठल सेवा



आषाढी वारीच्या निमित्ताने अवघे महाराष्ट्र विठ्ठलमय झाले आहे. 'ज्ञानबा-तुकाराम' आणि 'विठ्ठल-रुक्मिणी'च्या नामाचा गजर करत लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. मात्र, या वारीत केवळ मनुष्यप्राणीच नव्हे, तर पशू-पक्षीही तितक्याच भक्तीभावाने सहभागी झाले असून, त्यांची ही 'मुकी सेवा' सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसोबतच अश्व, बैल, मेंढ्या आणि श्वानही विठ्ठलाच्या चरणी लीन होताना दिसतात. पालखी सोहळ्यातील अश्वांची परंपरा अनादी काळापासून चालत आली आहे. अंकली (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथील शितोळे सरकार यांच्या मालकीचा अश्व पालखी सोहळ्यात अग्रभागी असतो. विशेष म्हणजे, या अश्वावर कोणीही स्वार होत नाही. पालखी सोहळ्याच्या प्रस्थानापूर्वी दररोज हे अश्व माऊलींच्या पालखीजवळ आणले जातात. यावेळी फुलांचे हार आणि बुक्का लावून या अश्वांचे पूजन केले जाते. रिंगण सोहळ्यात हे अश्व भरधाव धावत आपली सेवा पूर्ण करतात.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दोन अश्वांपैकी एक अकलूजच्या डाँ. धवलसिंह मोहिते- पाटील यांचा आहे. तर, दुसरा परभणी जिल्ह्यातील बाभळगावच्या रणेर कुटुबीयांचा आहे. वर्षभर रणेर कुटुंबीय देवाच्या अश्वाची व्यवस्था करतात. सोहळ्यास प्रस्थान ठेवण्यापूर्वी त्या अश्वाकडून दररोज दूरवर पळविणे, मोकळ्या रानामध्ये फिरवणे व गर्दीमध्ये तो बिथरु नये, यासाठी प्रशिक्षण देण्यात येते, असेही रणेर कुटुंबीयांनी सांगितले.

केवळ अश्वच नव्हे, तर 'खिल्लार' जातीचे बैलही रथाला जुंपून आपली सेवा बजावतात. वारकऱ्यांच्या प्रचंड गर्दीतून रथाला ओढण्याचे महत्त्वाचे काम हे बैल करतात. मागील काही वर्षांत या रथांच्या रचनेत बदल करण्यात आले असून, बैलांवर ताण येऊ नये म्हणून चाकांना बेरिंग आणि ब्रेक बसवण्यात आले आहेत.
याशिवाय, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात मेंढ्यांचे रिंगण हे आकर्षणाचे केंद्र असते. बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे मेंढ्या दरवर्षी या सोहळ्यात सहभागी होऊन आपली वेगळी ओळख निर्माण करतात. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस दलातील श्वानपथकही पालखी सोहळ्याचा अविभाज्य भाग असते. मुक्कामाच्या ठिकाणी आणि रिंगणाच्या वेळी ही श्वान तैनात राहून आपली कामगिरी चोख बजावतात. यंदाच्यावर्षी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात धाराशिव येथील बीडीएस पथकाची टिम सोबत रँचो हा ७ वर्षांचा लँब्रोडाँर जातीचा श्वान पालखी तळ व परिसरात गस्त घालत असतो. पालखीचा मुक्काम व विसावा परिसरात स्फोटक अथवा इतर धोकादायकसाठा नसल्याची खात्री करण्याची जबाबदारी रँचो मागील सहा वर्षांपासून वारीत करतोय, असे त्याचा सांभाळ करणारे विकास माने, राजू झेंडे व कैलास मुंढे यांनी सांगितले.
वारकरी संप्रदायात पशू-पक्ष्यांचे स्थान महत्त्वाचे मानले जाते. 'भूतदया' हाच धर्म मानून हे मुके जीव न बोलताही आपल्या कृतीतून विठ्ठलाची भक्ती करत आहेत. पूर्वी गजानन महाराज पालखी सोहळ्यात हत्तीही सहभागी व्हायचा. जरी आता हत्तींचा सहभाग नसला, तरी त्यांच्या प्रती असलेली आदरभावना आजही वारकऱ्यांच्या मनात कायम आहे. पंढरीच्या वारीत दिसून येणारा हा 'मानव आणि पशू' यांच्यातील नात्याचा सोहळा खऱ्या अर्थाने अध्यात्मिकतेचा एक वेगळा पैलू दर्शवतो.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
सामाजिक बांधिलकीचा आदर्श! स्वखर्चाने शाळा परिसर स्वच्छ; वायंगणी हायस्कूलला मिळाले सुरक्षित, सुंदर रूप | पंढरीच्या वारीत 'मुक्या' जीवांची अनोखी विठ्ठल सेवा | सोलापूर विद्यापीठात १५० कंत्राटी पदांची भरती; नव्या निविदेची प्रक्रिया सुरू | सोलापूरच्या शासकीय हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; १२ वी नंतर उज्ज्वल करिअरची सुवर्णसंधी | कारगिल विजय दिवसाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापुरात कारगिल शहीदांना सैनिकांच्या शिस्तबद्ध शैलीत मानवंदना | ठेकेदारांना अभय, नागरिकांना त्रास' | पीक विम्यात देवगडच्या शेतकऱ्यांवर अन्याय; कृषी अधिकाऱ्यांना सभागृहात धारेवर | वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तब्बल आठ तासाने मिळाला मृतदेह..... | पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने करुळ येथील शेतकरी बेपत्ता | ओटभरणी समारंभात रुजवले संस्कारांचे बीज! |