जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप

👤 शुभम सुराणा जळगाव | 📅 03 November 2026 | 👁 95 Views
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप


संजय पवार, अनिल पाटील, सुमित पाटील यांचे अर्ज अवैध

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मैदानातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या कठोर निर्णयामुळे दिग्गजांना मोठा धक्का बसला आहे. दाखल झालेल्या एकूण ४०२ अर्जांपैकी तब्बल ९३ अर्ज अवैध ठरवण्यात आले असून, यामध्ये जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष संजय पवार आमदार अनिल पाटील आणि आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. या धक्क्यामुळे सहकार आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उमेदवारी अर्जावर दाखल करण्यात आलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली असून, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


प्रमुख नेत्यांचे अर्ज अवैध; सहकार वर्तुळात चलबिचल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज आले होते. छाननी प्रक्रियेनंतर तब्बल ९३ अर्ज बाद झाल्याने अनेक दिग्गजांचे धाबे दणाणले आहेत.

संजय पवार व अनिल पाटील झटका

बँकेचे विद्यमान अध्यक्ष संजय पवार आणि आमदार अनिल पाटील हे गेल्या सलग दहा वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, छाननीत त्यांचेच अर्ज अवैध ठरल्याने त्यांच्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सुमित पाटील यांचा अर्जही बाद

पाचोरा तालुक्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सेवा संस्था मतदारसंघातून आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या पात्रतेवर आक्षेप घेत सतीश परशुराम शिंदे यांनी हरकत घेतली होती. छाननीदरम्यान हा आक्षेप ग्राह्य धरत त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला.




रक्षा खडसे यांना दिलासा

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या जिल्हा बँकेच्या थकबाकीदार असल्याचा आक्षेप घेत त्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेण्यात आली होती. यामुळे त्यांचा अर्ज रद्द होणार का, याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी दोन्ही बाजूंची सुनावणी घेतल्यानंतर रक्षा खडसे यांच्याविरोधातील हरकत अधिकृतपणे फेटाळून लावली. परिणामी, त्यांचा अर्ज कायम राहिला असून निवडणुकीच्या रिंगणात टिकून राहण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

आता लक्ष अपीलाच्या प्रक्रियेवर

छाननीत उमेदवारी अर्ज अवैध ठरलेल्या उमेदवारांना कायदेशीर लढा देण्याची संधी अद्याप उपलब्ध आहे. संबंधित बाद झालेल्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात पुढील तीन दिवसांच्या आत नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल करता येणार आहे.


आता संजय पवार, आमदार अनिल पाटील आणि सुमित पाटील यांच्यासह इतर बाद झालेले नेते अपीलाचा मार्ग स्वीकारतात का आणि अपीलात त्यांना दिलासा मिळतो का, यावरच त्यांच्या निवडणुकीतील भवितव्य अवलंबून राहणार आहे. या घडामोडींमुळे जळगाव जिल्हा बँकेचे राजकारण चांगलेच तापले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप | *जिल्हा परिषद एसीबीचा मोठी कारवाई ! १० हजारांची लाच घेताना उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात* | रान पिकवलं, रेकॉर्ड मोडला! भडगावच्या संजय पाटलांचा ज्वारी उत्पादनात संपूर्ण महाराष्ट्रात डंका; हेक्टरी १०२.२५ क्विंटलचा नवा उच्चांक* | उमरेड - करह्रांडला अभ्यारण्यातील गोठणगाव चा युवा नर वाघ पोहोचला पेंचच्या चोर बाहुली जंगलात | सांगली जिल्हा बँकेच्या रणांगणात राजकीय भूकंपाची चाहूल! | भडगाव येथे AEG फाउंडेशनच्या वतीने कृषी उद्योजकांना प्रमाणपत्रांचे वितरण . | युवरंग २०२६ वर मुळजी जेठा महाविद्यालयाची मोहोर; चोपडा महाविद्यालय उपविजेतेपदी! | एका क्षणात होत्याचे नव्हते! भरधाव कारचा भीषण अपघात; तेलंगणातील चालकाचा दुर्दैवी अंत, तिघे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे | रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देणाऱ्या कुचीच्या वैभव सरवदे यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित! | कुचीमध्ये विहिरीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; गावात खळबळ! |