शाहूवाडी तालुक्यातील पैजारवाडी येथील सद्गुरु चिले महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक विधी, आरती, भजन, कीर्तन, प्रवचन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.
पहाटे काकड आरतीने उत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर श्रींचा रुद्र महाभिषेक, विष्णुयाग, होमहवन, नैवेद्य, त्रिकाळ आरती तसेच सद्गुरु पूजनाचे विधी भक्तिभावाने पार पडले.
यावेळी पंढरपूर ते पैजारवाडी पायी पालखी दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली. संध्याकाळी भजन, कीर्तन, प्रवचन आणि हरिनामाच्या गजरात मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. श्रींच्या मूर्तीला करण्यात आलेली आकर्षक फुलांची सजावट भाविकांचे विशेष आकर्षण ठरली. सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
उत्सवानिमित्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, व्यवस्थापक बाबुराव गराडे, विश्वस्त जयसिंग पाटील, चंद्रशेखर खूटाळे, पुजारी बापूजी यादव तसेच सेवेकरी उपस्थित होते.
दरम्यान, सद्गुरु चिले महाराजांचे जन्मगाव जेऊर (ता. पन्हाळा) येथेही गुरुपौर्णिमेनिमित्त आरती, महाप्रसाद वितरण आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी भैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, गावकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.