सांगली जिल्हा बँकेत माजी खासदार संजय पाटील यांचा विजय :माजी आमदार सुमन पाटील यांचा पराभव!
तासगाव नगरपालिका, पंचायत समितीनंतर जिल्हा बँकेतही आमदार रोहित पाटील यांना धक्का;
दैनिक आखुर / संतोष एडके तासगाव
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तासगाव तालुका सोसायटी गटाच्या निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत विजय मिळवत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. माजी आमदार सुमन पाटील यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव झाल्याने तासगावच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. संजय पाटील यांना ४०, तर सुमन पाटील यांना ३८ मते मिळाली. एक मत बाद ठरले. या निकालाने केवळ जिल्हा बँकेतील एका जागेचा निर्णय झाला नसून तालुक्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय ताकदीची नव्याने मांडणी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
संजय पाटील यांनी स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरून सुमन पाटील यांना दिलेले आव्हान अखेर यशस्वी ठरले. विशेष म्हणजे ही लढत दोन मतांच्या फरकाने निकाली निघाल्याने प्रत्येक मताचे राजकीय महत्त्व किती निर्णायक असते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
सहकारातील ताकदीला मतपेटीतून आव्हान!
तासगाव तालुक्यातील विकास सोसायट्यांवर आमदार रोहित पाटील यांच्या गटाचे वर्चस्व असल्याची राजकीय धारणा होती. तालुक्यात एकूण ८० विकास सोसायट्या असताना एका सोसायटीमध्ये मतदानाचा ठराव न झाल्याने तेथे मतदान होऊ शकले नाही. त्यामुळे ७९ सोसायट्यांच्या माध्यमातून मतदानाची प्रक्रिया पार पडली.
अशा परिस्थितीत रोहित पाटील यांच्या मातोश्री सुमन पाटील यांना विजय मिळवता न येणे, हा स्वर्गीय आर. आर. पाटील अर्थातच आमदार रोहित पाटील गटाला राजकीय वर्चस्वाच्या दृष्टीने आत्मपरीक्षणाचा विषय ठरला आहे. सोसायट्यांवरील कथित वर्चस्व आणि प्रत्यक्ष मतपेटीतून मिळालेला कौल यातील अंतर आता चर्चेचा विषय बनले आहे.
दोन मतांचा विजय, राजकीय परिणाम मात्र मोठा!
संजय पाटील यांच्या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी मतांच्या फरकाने त्यांनी बाजी मारली. निवडणुकीपूर्वी दोन्ही गटांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. मतदारांशी संपर्क, गटांतर्गत चर्चा आणि मतदानाचे नियोजन यावर दोन्ही बाजूंनी भर देऊन योग्य ती खबरदारी मतदारांच्या संपर्कासाठी घेतली होती.
मात्र, प्रत्यक्ष मतमोजणीत संजय पाटील यांना ४० मतांचा कौल मिळाला. अवघ्या दोन मतांनी मिळालेला हा विजय संजय पाटील गटासाठी मनोबल वाढवणारा ठरला आहे. दुसरीकडे, अपेक्षित संख्याबळ असल्याची चर्चा असतानाही पराभव झाल्याने रोहित पाटील गटाला आपल्या संघटनात्मक ताकदीचा फेरआढावा घ्यावा लागणार आहे. गावागावातील गटातट, आमदार रोहित पाटील यांच्यावर असणारी नाराजी, स्वर्गीय आबांच्या काळातील जुन्या जाणत्या पहिल्या व दुसऱ्या फळीतील कार्यकर्तेआणि त्यातील बहुतांशी मतदारांची नाराजी मतपेटीतून व्यक्त झाली की मतदारांची दिवाळी कारणीभूत ठरली, याचा खोलवर अभ्यास करून आमदार रोहित पाटील अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
निवडणुकांच्या निकालातून बदलते राजकीय संकेत!
विधानसभा निवडणुकीत आमदार रोहित पाटील यांनी विजय मिळवल्यानंतर तालुक्यातील राजकीय समीकरणे त्यांच्या बाजूने असल्याचे चित्र होते. मात्र, त्यानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकीत त्यांच्या गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. पंचायत समितीच्या सत्तेवरही संजय पाटील गटाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
जिल्हा परिषद निवडणुकीत रोहित पाटील गटाने आपले वर्चस्व कायम ठेवले असले, तरी पंचायत समितीतील सत्तांतर आणि आता जिल्हा बँकेतील पराभव या दोन घटनांनी राजकीय परिस्थितीचे वेगळे चित्र समोर आणले आहे.
त्यामुळे विधानसभा विजयाच्या जोरावर तालुक्यातील सर्वच राजकीय क्षेत्रांत वर्चस्व कायम राहील, असे गृहीत धरणे चुकीचे ठरू शकते, असा संदेश या निकालातून मिळत आहे.
आर. आर. पाटील कुटुंबाविरुद्ध संजय पाटील यांचा पहिला थेट विजय!
या निवडणुकीला आणखी एक ऐतिहासिक राजकीय संदर्भ आहे. स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या कुटुंबातील सदस्याविरोधात संजय पाटील यांनी प्रथमच थेट निवडणूक लढवत विजय मिळवला आहे. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील यांनी संजय पाटील यांचा पराभव केला होता. मात्र, आता सुमन पाटील यांच्याविरोधात मिळालेला विजय संजय पाटील यांच्या राजकीय वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या विजयामुळे संजय पाटील समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून तालुक्यातील आगामी राजकीय संघर्षासाठी या निकालामुळे नव्या आत्मविश्वासाची भर पडण्याची शक्यता आहे.
रोहित पाटील गटापुढे संघटन मजबूत करण्याचे आव्हान!
अपेक्षित संख्याबळ असल्याची चर्चा असतानाही पराभव झाल्याने रोहित पाटील गटाला आपल्या संघटनात्मक ताकदीचा फेरआढावा घ्यावा लागणार आहे. गावागावातील स्वर्गीय आबांच्या पाठीशी असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मध्येच पडलेले दोन किंवा तीन गट त्या गटातटातूनच आमदार रोहित पाटील यांच्यावर असणारी नाराजी स्वर्गीय आबांच्या काळातील जुन्या जाणत्या पहिल्या व दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते व सध्या जिल्हा बँकेतील मतदार यांच्यामध्ये व आमदार रोहित पाटील यांच्यामध्ये असणारा संवाद किंबहुना नाराजी काही ठिकाणी मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केली की दिवाळीपूर्वीच लक्ष्मीपूजन होऊन मतदारांची दिवाळी साजरी झाली, याचीही चौकाचौकांत आणि गावागावातील पारांवर चर्चा रंगू लागली आहे.
जर-तरच्या या गोष्टी असल्या तरी जनमताचा कौल आमदार रोहित पाटील यांना मान्य करावा लागेल. या तिन्ही धक्क्यांचा आमदार रोहित पाटील यांना अभ्यास करावा लागेल. अंतिम निष्कर्षाच्या मुळापर्यंत पोहोचून स्वतः आत्मचिंतन करून बदल करावे लागतील; अन्यथा धक्क्यावर धक्के सहन करण्याची वेळ येऊ शकते.
जिल्हा बँकेतील या निकालाने संजय पाटील गटाला नवी राजकीय ऊर्जा मिळाली आहे, तर रोहित पाटील गटाला आपल्या राजकीय रणनीतीचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. तासगावच्या राजकारणात बदलत्या समीकरणांची ही नांदी ठरणार की आगामी काळात पुन्हा नवे राजकीय वर्चस्व निर्माण होणार, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.