सांगली जिल्हा बँकेच्या रणांगणात राजकीय भूकंपाची चाहूल!

👤 कवठेमहांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट | 📅 01 November 2026 | 👁 14 Views
सांगली जिल्हा बँकेच्या रणांगणात राजकीय भूकंपाची चाहूल!
सहा जागांसाठी दिग्गजांचा कस; तासगाव, कवठेमहांकाळ आणि जतच्या लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष! संजयकाका विरुद्ध सुमनताई, घोरपडे सरकार विरुद्ध टी. व्ही. आबा, पडळकर विरुद्ध विनोद पवार; विजय कोणाचा आणि प्रतिष्ठा कोणाची राखली जाणार?
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापवले असून, सहा जागांसाठी सुरू असलेल्या मतदानाच्या रणधुमाळीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेषतः तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत या तीन संस्था गटांतील लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले आहे. ही निवडणूक केवळ जिल्हा बँकेतील प्रतिनिधित्वाची नसून, जिल्ह्यातील नेत्यांची राजकीय ताकद, कार्यकर्त्यांचे संघटन आणि आगामी राजकीय वाटचालीची दिशा ठरवणारी ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

*तासगावमध्ये माजी खासदार संजयकाका-माजी आमदार सुमनताई संघर्षाची प्रतिष्ठेची लढाई!*

तासगाव संस्था गटात माजी खासदार संजयकाका पाटील आणि माजी आमदार सुमनताई पाटील यांच्यातील लढतीने राजकीय वातावरणात चांगलीच रंगत आणली आहे. दोन्ही बाजूंनी आपापली राजकीय ताकद पणाला लावली असून, मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने जाणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

*कवठेमहांकाळमध्ये घोरपडे सरकार विरुद्ध टी. व्ही. आबा; राजकीय प्रतिष्ठेचा कस!*

कवठेमहांकाळ संस्था गटातील लढतही तितकीच लक्षवेधी ठरली आहे. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार आणि कार्यकर्त्यापासून नेता म्हणून राजकीय ओळख निर्माण केलेले टी. व्ही. आबा पाटील यांच्यात थेट सामना रंगला आहे. या लढतीत कोणाची राजकीय ताकद वरचढ ठरणार, याकडे तालुक्यातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

*जतमध्ये पडळकरांच्या ताकदीची परीक्षा; विनोद पवार यांचे आव्हान!*

जत संस्था गटात आमदार गोपीचंद पडळकर आणि पडळकरविरोधी राजकीय गटांची साथ लाभलेले विनोद पवार यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पडळकर आपली राजकीय ताकद सिद्ध करणार की विरोधकांच्या एकजुटीचा प्रभाव निकालात दिसणार, हा उत्सुकतेचा विषय बनला आहे.

*१५ जागा बिनविरोध; मग सहा जागांवरच एवढा संघर्ष का?*

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत १५ जागा बिनविरोध झाल्या असताना उर्वरित सहा जागांसाठी मात्र मोठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली जात आहे. एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि सहकार क्षेत्र अडचणीत असताना निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चांना महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र, दुष्काळी पट्ट्यातील महत्त्वाच्या संस्था गटांमध्येच निवडणुकीचा आखाडा रंगल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा राजकीय प्रतिष्ठा महत्त्वाची ठरली का? काही उमेदवारांना राजकीय ताकद दाखविण्याची संधी देण्यासाठीच हा संघर्ष निर्माण झाला का? की जिल्हा बँकेवरील वर्चस्वासाठी पडद्यामागे मोठ्या राजकीय खेळी खेळल्या जात आहेत? अशा चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे.

*निकाल ठरवणार जिल्ह्याच्या राजकारणाची पुढील दिशा!*

या निवडणुकीत कोण जिंकणार, यापेक्षाही कोणाचा राजकीय प्रभाव कायम राहणार आणि कोणाची ताकद कमी होणार, याचीच चर्चा अधिक रंगली आहे. तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत या तीनही ठिकाणचे निकाल अनेक राजकीय नेत्यांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनले आहेत.

एकूणच, जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी सुरू असलेला हा राजकीय महासंग्राम म्हणजे सहकाराच्या मैदानातील सत्तासंघर्षाची खरी परीक्षा ठरत आहे. आता मतदारराजा कोणाला कौल देणार, कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आणि कोणाला पराभवाचा धक्का सहन करावा लागणार, याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
सांगली जिल्हा बँकेच्या रणांगणात राजकीय भूकंपाची चाहूल! | भडगाव येथे AEG फाउंडेशनच्या वतीने कृषी उद्योजकांना प्रमाणपत्रांचे वितरण . | युवरंग २०२६ वर मुळजी जेठा महाविद्यालयाची मोहोर; चोपडा महाविद्यालय उपविजेतेपदी! | एका क्षणात होत्याचे नव्हते! भरधाव कारचा भीषण अपघात; तेलंगणातील चालकाचा दुर्दैवी अंत, तिघे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे | रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देणाऱ्या कुचीच्या वैभव सरवदे यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित! | कुचीमध्ये विहिरीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; गावात खळबळ! | न्यायालयाचे ‘कायदेशीर कवच’ विद्यार्थ्यांच्या दारात: भडगावमध्ये ‘सुरक्षित बचपन’ अभियानाचा दिमाखदार समारोप! | 39 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मुंबई पोलीस दलातील PSI संजय टिबे सेवानिवृत्त | शिवसेनेच्या दोन तर भाजपच्या एका उमेदवाराची संचालकपदी निवड; पारोळा, एरंडोल आणि भुसावळमध्ये बिनविरोध विजय | सागवान लाकूड चोरी रोखण्यासाठी गेलेल्या वनमजुरावर कुऱ्हाडीने हल्ला; दोन्ही हातांवर केले वार! |