विशेष प्रतिनिधी -:
जळगाव शहराजवळील बांभोरी उड्डाणपुलावर कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पंकज प्रकाश चौधरी, रवींद्र अरुण चौधरी आणि हरीश हिंमत चौधरी अशी मृतांची नावे आहेत. तिघेही चुलतभाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे झुरखेडा आणि चोपडा परिसरात शोककळा पसरली आहे.
धडक इतकी भीषण की कारचा चक्काचूर:
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज चौधरी यांच्या काकांचा रविवारी दशक्रिया विधी होता. या कार्यक्रमासाठी त्यांचा आत्याचा मुलगा जळगावहून झुरखेडा येथे आला होता. त्याला भुसावळजवळील वनवली येथील देवीच्या यात्रेला जायचे असल्याने तिघे त्याला कारने सोडण्यासाठी गेले होते. त्याला वनवली येथे सोडल्यानंतर पंकज, रवींद्र आणि हरीश हे तिघे झुरखेड्याकडे परतत होते. दरम्यान, बांभोरी उड्डाणपुलावर समोरून आलेल्या कंटेनरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की कार फिरून तिचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला. पंकज आणि रवींद्र हे झुरखेडा येथील रहिवासी होते, तर हरीश हा सध्या चोपडा येथे वास्तव्यास होता.
अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाइकांनी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालय परिसरात कुटुंबीय आणि परिचितांची गर्दी झाली होती. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील यांनी घटनास्थळासह रुग्णालयात भेट देऊन दुःखात बुडालेल्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
हरीशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
मृत हरीश चौधरी हा सोलर क्षेत्रात काम करत होता. त्याचे लग्न झाले होते. त्याला दोन लहान भाऊ असून ते झुरखेडा येथे राहतात. त्याचे वडील चोपडा तालुक्यातील सनपुले येथील दिव्यांग शाळेत स्वयंपाकी म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबातील तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कंटेनर कठड्यावर अडकल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी:
अपघातानंतर कंटेनर उड्डाणपुलाच्या कठड्यावर धोकादायक स्थितीत अडकला. त्यामुळे तो पुलावरून खाली कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. खबरदारी म्हणून अपघातस्थळी दोन्ही बाजूंनी वाहने थांबवण्यात आली. परिणामी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आणि जळगाव शहराच्या दिशेने खोटेनगरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कार आणि कंटेनरची धडक होताच मोठा आवाज झाला. कारमधील व्यक्तींना वाचवण्यासाठी नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र, या भीषण अपघातात तिघांनाही जीव गमवावा लागला.
बायपास बंदमुळे वाढलेली वाहतूक पुन्हा चर्चेत:
पाळधी-तरसोद बायपास बंद असल्यामुळे शहरातून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यांत विविध अपघातांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बांभोरी उड्डाणपुलावरील या अपघातात एकाच कुटुंबातील तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापन आणि बायपास बंदचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.