वडजी येथील तलाठी सौ. वैशाली वाघ यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास भडगाव तहसीलवर शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

👤 शुभम सुराणा जळगाव | 📅 06 October 2026 | 👁 45 Views
वडजी येथील तलाठी सौ. वैशाली वाघ यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास भडगाव तहसीलवर शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा
भडगाव (विशेष प्रतिनिधी):
गत ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस आणि शिवणी येथील जामदा कालवा फुटल्यामुळे वडजी सजे अंतर्गत येणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. मात्र, या आपत्तीला दोन महिने उलटूनही महसूल विभागाच्या भोंगळ कारभारामुळे बाधित शेतकऱ्यांना अद्याप हक्काची नुकसान भरपाई मिळालेली नाही. यातच वडजी सजेच्या तलाठी सौ. वैशाली वाघ यांच्या मनमानी आणि संशयास्पद कारभारा विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव पश्चिम जिल्हा शाखेने केली आहे. या संदर्भात महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रदिप भिकनराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी भडगावच्या मा. तहसीलदार साहेबांना एक जाहीर निवेदन सादर करण्यात आले.
खऱ्या शेतकऱ्यांना डावलून बोगस नावांना लाभ दिल्याचा गंभीर आरोप
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात तलाठी सौ. वैशाली वाघ यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महसूल कर्मचाऱ्यांनी पिकांचे पंचनामे करूनही शासनाकडून अद्याप नुकसान भरपाईची अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली नाही. वडजी येथील तलाठी शेतकऱ्यांशी उद्धटपणे वागत असून, त्यांनी उन्हाळी ज्वारीच्या नुकसानीची खोट्या व बोगस नावांची यादी तयार करून काही ठराविक लोकांना पैशांचा लाभ मिळवून दिल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, प्रत्यक्ष नुकसान सोसलेले खरे शेतकरी मात्र केवळ तलाठी यांच्या चुकीच्या आणि बेजबाबदार कारभारामुळे भरपाईपासून वंचित राहिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी तलाठी यांना तात्काळ निलंबित करावे, अशी आक्रमक मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
माहितीसाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, या निवेदनाच्या प्रतिलिपि थेट मा. ना. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीषभाऊ महाजन साहेब यांच्यासह जळगावचे जिल्हाधिकारी आणि पाचोरा प्रांतअधिकारी यांना माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. जेणेकरून वरीष्ठ पातळीवरून या भ्रष्टाचाराची दखल घेतली जाईल.
८ दिवसांचा अल्टिमेटम; भडगाव तहसील कार्यालयासमोर होणार आंदोलन
निवेदन सादर करताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी आणि स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला आहे. जर पुढील ८ दिवसांच्या आत संबंधित तलाठी यांच्यावर प्रशासकीय कारवाई झाली नाही, तर वडजी सजेतील सर्व नुकसानग्रस्त शेतकरी भडगाव तहसील कार्यालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलनाला बसतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रदिप भिकनराव पाटील यांच्यासह जगदीश शिंदे (जिल्हा संघटक), योगेश पाटील (जिल्हा संघटक), बाबाजी भाऊराव पाटील, विजय पाटील, रावसाहेब पाटील, सचिन सुभाष पाटील आणि भरत विठ्ठल पाटील या बाधित शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनामुळे आता महसूल वर्तुळात एकच खळबळ उडाली असून प्रशासन यावर काय पाऊल उचलणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
वडजी येथील तलाठी सौ. वैशाली वाघ यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास भडगाव तहसीलवर शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा | *महाराष्ट्र चे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शेतकऱ्यांच्या बांधावर* | ट्रॅक्टर अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू एडगाव-आंबेडी येथील दुर्घटना ; तालुक्यात हळहळ... | मराठा समाजाचे नेते एस. टी. सावंत यांचे निधन | भडगाव तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे पंचनामे सुरू | खुल्या जिल्हा कारागृहाला मंजुरी; बिलाखेड शिवारात होणार उभारणी | *खासगी पंटरमार्फत २० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी भुसावळचे पोलिस हवालदार निलंबित* | *कॉफी शॉपच्या नावाखाली अश्लील चाळे; जळगावच्या 'हेवन कॅफे' मालकाविरुद्ध गुन्हा दाखल* | *दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या व गिरणा नदी पात्रावरील अवैध्य वाळूचा उपसा थांबवा या मागणीसाठी भाजपा किसान मोर्चा* *चे जिल्हाधिकारी यांना निवेदन* | चोरीस गेलेले १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; तासगाव पोलिसांची कारवाई १२७.१८ ग्रॅम सोन्याचे दागिने न्यायालयाच्या आदेशाने हक्कदाराच्या स्वाधीन |