जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस
👤 संतोष एडके तासगाव |
📅
07 September 2026 |
👁 88 Views
जत परिसरातील पवनचक्क्यांमधील कॉपर केबल व अॅल्युमिनियमच्या विद्युत तारा चोरी करणाऱ्या टोळीचा सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) पर्दाफाश केला. या कारवाईत लखन केशव शिंदे (वय २५, रा. विठ्ठलनगर, जत) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून १४ लाख ७४ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
६ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने जत येथील झुलेलाल मंदिर ते वुडलॅण्ड हॉटेल परिसरात सापळा रचून बिना नंबर प्लेटच्या टाटा एस वाहनाची तपासणी केली. वाहनातून कॉपर व अॅल्युमिनियम वायरचे बंडल आढळून आले. चौकशीत आरोपीने साथीदारांच्या मदतीने गेल्या वर्षभरापासून पवनचक्क्यांमधील तारा चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार जत पोलीस ठाण्यात दाखल सात चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त मुद्देमालामध्ये अॅल्युमिनियम व कॉपर केबल, सबमर्शीबल केबल, कट पॉईंट चॅनेल तसेच चोरीसाठी वापरलेले टाटा एस वाहनाचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व पथकाने केली. पुढील तपास जत पोलीस करीत आहेत.