एकजुटीने नशामुक्तीचा निर्धार करूया; अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा करूया : पालकमंत्री चंद्रकांत पाटील नशामुक्ती निर्धार पदयात्रेला सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘नशामुक्त सांगली, सुरक्षित सांगली’चा सामूहिक संकल्प
👤 संतोष एडके तासगाव |
📅
24 August 2026 |
👁 4 Views
सांगली :
दहशतवाद, नक्षलवाद आणि व्यसनवादाचे निर्मूलन हे केंद्र व राज्य शासनाचे ध्येय आहे. तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यात ओढणाऱ्या देशद्रोही प्रवृत्तींचे मनसुबे उधळून लावत भावी पिढी सुरक्षित ठेवणे हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे प्रत्येक सांगलीकराने एकजुटीने नशामुक्तीचा निर्धार करून अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
‘अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा’ अभियानांतर्गत आयोजित नशामुक्ती निर्धार पदयात्रेच्या सांगतेनंतर पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त संजीता महापात्र, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पालकमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विटा येथे सुमारे ३० कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा आढळून आला होता. त्यानंतर जिल्ह्यातील अस्वस्थता दूर करण्यासाठी प्रतिबंध, प्रबोधन आणि समुपदेशन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून ‘अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा’ अभियान हाती घेण्यात आले. गेल्या दीड वर्षात विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात आली आहे.
अमली पदार्थांची माहिती देणाऱ्या नागरिकांना तसेच अमली पदार्थविरोधी कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बक्षिसे देऊन प्रोत्साहन देण्यात आले. ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून ६०० शिक्षकांसह हजारो विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे देण्यात आले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचाराची व्यवस्था करण्यात आली. या संयुक्त प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडण्यात यश येत असल्याचे दिसत आहे. ही मोहीम पुढेही प्रभावीपणे सुरू ठेवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
निराशा आणि रिकामेपणातून व्यसनाधीनता वाढते, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांना संगीत, नृत्य, अभिनय तसेच लाठी-काठीसारख्या विविध कलांचे व कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. यासाठी आवश्यक खर्चाची तरतूद करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
सांगलीकरांचे एकत्रित पाऊल
‘नशामुक्त सांगली – एकत्रित पाऊल, निरोगी भविष्य’ या अभियानांतर्गत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित नशामुक्ती निर्धार पदयात्रेला सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हातात नशाविरोधी संदेश असलेले फलक, ओठांवर जनजागृतीच्या घोषणा आणि मनात नशामुक्त समाजाचा निर्धार घेऊन नागरिकांनी पदयात्रेत सहभाग घेतला.
कल्पद्रुम मैदानापासून पोलीस मुख्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या पदयात्रेत लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस दल, विद्यार्थी, युवक-युवती, महिला, सामाजिक व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
पदयात्रेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनीफितीद्वारे दिलेली अमली पदार्थविरोधी शपथ उपस्थितांनी घेत ‘नशामुक्त सांगली, सुरक्षित सांगली’चा सामूहिक संकल्प केला. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता झाली