देवगड आनंदवाडी बंदर विकासासाठी ८५ कोटी मंजूर पुढील १८ महिन्यांत सुरक्षित व सुसज्ज बंदर विकसित करणार; मच्छीमारांच्या विकासासह जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढण्याचे सामर्थ्य – मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे
👤 तुषार शिंगाडे |
📅
21 August 2026 |
👁 9 Views
देवगड (प्रतिनिधी)
देवगड आनंदवाडी बंदर विकासासाठी ८५ कोटी रुपयांची रक्कम मंजूर असून, या निधीतून पुढील १८ महिन्यांत हे बंदर सुरक्षित व सुसज्ज बंदर म्हणून विकसित होईल. या बंदरामुळे मच्छीमारांचा विकास होण्याबरोबरच जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढण्याचे सामर्थ्य या बंदरात आहे, असे ठोस प्रतिपादन मत्स्य व्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांनी देवगड येथे केले.केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत आनंदवाडी बंदराचा विकास हाती घेण्यात आला असून, बंदराच्या आराखड्यानुसार कामे सुरू आहेत. मात्र, गेली १८ वर्षे हा प्रकल्प रेंगाळला होता. ना. नितेश राणे यांची राज्याच्या मत्स्य व बंदर विकास मंत्री म्हणून निवड झाल्यानंतर या बंदराच्या विकासाला गती मिळाली आहे. बंदराची पाहणी त्यांनी यावेळी केली. त्यानंतर मच्छीमार नेते तसेच मच्छीमारांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी व्यासपीठावर ॲड. अजित गोगटे, सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, राज्याचे मत्स्य अधिकारी प्रकाश नहाले, जिल्हा मत्स्य अधिकारी सागर कुवेसकर, देवगड मत्स्य अधिकारी किरण वाघमारे, जिल्हाधिकारी तृप्ती धोंडभिसे, प्रांताधिकारी जगदीश कातकर, महसूल नायब तहसीलदार संतोष खरात, बाळ खडपे, नंदकुमार घाटे, देवगड सोसायटीचे अध्यक्ष द्विजकांत कोयंडे, तारामुंबरी सोसायटीचे नारायण प्रभू, देवदुर्ग सोसायटीचे अध्यक्ष तुषार पारकर आदी उपस्थित होते.
देवगड आनंदवाडी बंदरासाठी ८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. हा निधी मच्छीमारांचा व सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे. त्यामुळे पूर्ण निधी खर्च करून हे बंदर १०० टक्के विकसित करणे, यासाठीच आपण हा दौरा केला आहे, असे सांगून ना. राणे म्हणाले की, निधी खर्च करण्यासाठी एकूण २८ विभाग आहेत. प्रत्येक विभागावर खर्च होण्यापूर्वी त्याला प्राधान्यक्रम देऊन खर्च झाला पाहिजे. त्यासाठी मच्छीमार नेते व मच्छीमारांनी या संवादातून सूचना मांडल्यास त्याप्रमाणे निधी खर्च केला जाईल.पुढील १८ महिन्यांत हा प्रकल्प मार्गी लागणे अपेक्षित आहे. त्याला वाढीव निधीची गरज भासल्यास तो मागता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होणार असून, ते सामर्थ्य या बंदरात आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी जगन्नाथ कोयंडे, संजय बांदकर, नंदकुमार घाटे, ॲड. अजित गोगटे, नारायण प्रभू यांनी सूचना मांडताना बंदरातील गाळ काढणे, तिन्ही मच्छीमारी सोसायट्यांना डिझेल पंपची सुविधा, बर्फ कारखाना यांसह विविध गैरसोयींकडे लक्ष वेधले. यावेळी मच्छीमारांच्या वतीने काही निवेदनेही देण्यात आली.या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर, संतोष तारी, निवृत्ती तारी, एकनाथ तेली, अमोल तेली, शरद ठूकरुल, योगेश चांदोस्कर, जि. प. सदस्य लोके, संतोष किंजवडेकर, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.