कुपवाड दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ दि २२ ऑगस्ट - शनिवारच्या तासगाव बंदला मुस्लिम समाजाचा जाहीर पाठिंबा
👤 संतोष एडके तासगाव |
📅
20 August 2026 |
👁 3 Views
तासगाव : कुपवाड येथील विघ्नहर्ता शांती कॉलनी परिसरात घरासमोर कचरा टाकण्याच्या किरकोळ वादातून केसरेकर दाम्पत्याची झालेली दुहेरी हत्या संपूर्ण सांगली जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण करणारी ठरली आहे. या अमानुष हत्याकांडाच्या निषेधार्थ शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या तासगाव बंदला शहरातील मुस्लिम समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे.
शनिवार, १५ ऑगस्ट रोजी कुपवाडमधील विघ्नहर्ता शांती कॉलनी येथे घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून फरीद अब्दुल शेख (वय ५२) आणि केसरेकर कुटुंबीयांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर गंभीर हल्ल्यात झाले. आरोपीने घरातून हातोडा व चाकू आणून मोहन नागाप्पा केसरेकर (वय ४५) यांच्या डोक्यात हातोड्याने प्रहार केला, तर मनीषा मोहन केसरेकर (वय ३५) यांच्या पोटात चाकूने वार केल्याचा आरोप आहे.
गंभीर जखमी झालेल्या मनीषा केसरेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या मोहन केसरेकर यांचाही बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेचे दुहेरी हत्याकांडात रूपांतर झाले. या प्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपी फरीद शेख याला घटनेनंतर अवघ्या दोन तासांत जेरबंद केले.
दरम्यान, या अमानुष घटनेचा तासगाव शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. आरोपीवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करावी आणि दोष सिद्ध झाल्यास फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली.
समाजातील हिंसक आणि चुकीच्या प्रवृत्तींना कोणत्याही परिस्थितीत थारा देता कामा नये. अशा अमानुष कृत्यांना तासगाव शहरातील मुस्लिम समाजाचे कोणतेही समर्थन नसून, शांतता, सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि कायद्याचा सन्मान कायम राहावा, अशी स्पष्ट भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
कुपवाड दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या तासगाव बंदला मुस्लिम समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे. यासंदर्भातील मुस्लिम समाजातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल टकले यांना देण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते निसार मुल्ला, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष अनवर (भाई) इनामदार, जमीर मुजावर, अशपाक मुल्ला, अल्ताफ मेहत्तर, शमशुद्दीन मुल्ला, शकील सय्यद यांच्यासह मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“अमानुष कृत्याला धर्म नसतो; दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी भावना यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.