राजे रामराव महाविद्यालयात शाश्वत ऊर्जा उपायांसाठी कार्यक्षम पदार्थांच्या प्रगत संश्लेषण पद्धती विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा
जत, दि. १९ : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित राजे रामराव महाविद्यालय, जत येथील भौतिकशास्त्र विभाग, रसायनशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शाश्वत ऊर्जा उपायांसाठी कार्यक्षम पदार्थांच्या प्रगत संश्लेषण पद्धती’ या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन मंगळवार, दि. २५ ऑगस्ट, २०२६ रोजी करण्यात आले आहे.
आजच्या काळात शाश्वत ऊर्जा निर्मिती, ऊर्जा साठवणूक आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या विकासासाठी नवीन व कार्यक्षम पदार्थांची निर्मिती अत्यंत महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत कार्यक्षम पदार्थांची निर्मिती, प्रगत संश्लेषण तंत्रज्ञान, नॅनोपदार्थ, ऊर्जा साठवणूक, सौरऊर्जा, थर्मोइलेक्ट्रिक ऊर्जा, इंधन पेशी आणि शाश्वत ऊर्जा तंत्रज्ञान यांसारख्या विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्रीमंत इंद्रजीतराजे डफळे सरकार भूषविणार आहेत. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रो. डॉ. एस. एस. कोळेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेसाठी चीन येथील हेनान विद्यापीठातील रसायनशास्त्र व आण्विक विज्ञान महाविद्यालयाचे डॉ. आर. एस. सुतार तसेच दक्षिण कोरिया येथील डोंगगुक विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स व विद्युत अभियांत्रिकी विभागाचे डॉ. ए. एम. तेली हे आमंत्रित तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
समारोप समारंभासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य श्री. कृष्णा बिसले प्रमुख पाहुणे म्हणून, तर विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. संजय लट्ठे विशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांना आधुनिक संशोधन पद्धती, नवीन तंत्रज्ञान आणि शाश्वत ऊर्जा क्षेत्रातील संशोधनाच्या विविध संधींची माहिती मिळणार आहे. तसेच देश-विदेशातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची आणि संशोधनातील नवीन प्रवाह समजून घेण्याची संधी सहभागींना मिळणार आहे.
कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. के. के. रानगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. आयोजन समितीचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. ए. के. भोसले,समन्वयक म्हूणन डॉ अरविंद पवार व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. आर. एस. कुलाळ यांच्याबरोबर विविध विभागांचे प्राध्यापक व समिती सदस्य कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.
विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांनी या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.