सांगली एलसीबीची धडाकेबाज कारवाई; खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या दोन तासांत जेरबंद

👤 संतोष एडके तासगाव | 📅 15 August 2026 | 👁 133 Views
 सांगली एलसीबीची धडाकेबाज कारवाई; खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या दोन तासांत जेरबंद
कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा खून; आरोपी दोन तासांत जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण( LCB ) सांगली यांची कारवाई

: कुपवाड येथील विघ्नहर्ता शांती कॉलनी परिसरात घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून महिलेचा खून झाल्याची घटना शनिवारी (१५ ऑगस्ट) सकाळी घडली. या प्रकरणातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या दोन तासांत जेरबंद केले. फरीद अब्दुल शेख (वय ५२, सध्या रा. विघ्नहर्ता शांती कॉलनी, कुपवाड, मूळ रा. वानलेसवाडी, सांगली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

या घटनेत मनीषा मोहन केसरेकर (वय ३५) यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती मोहन नागाप्पा केसरेकर (वय ४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी मनीषा यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१), १०९ (१), ११५ (२), ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून आरोपी फरीद शेख आणि केसरेकर कुटुंबीयांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाल्यानंतर आरोपीने घरातून हातोडा व चाकू आणून मोहन केसरेकर यांच्या डोक्यात हातोड्याने प्रहार केला. तसेच मनीषा केसरेकर यांच्या पोटात चाकूने वार केल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांनाही गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान मनीषा केसरेकर यांचा मृत्यू झाला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आरोपीचा शोध घेऊन तातडीने अटक करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पोलिसांचे पथक तयार केले. आरोपीच्या शोधासाठी पथकाने विविध ठिकाणी तपास सुरू केला.

दरम्यान, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी यांना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी फरीद शेख हा मिरज-सांगली रस्त्यावरील वानलेसवाडी येथील बंद पडलेल्या मैत्रेय बिल्डिंगजवळ थांबलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने तातडीने तेथे धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने केसरेकर कुटुंबीयांशी पूर्वीपासून वाद असल्याचे सांगितले. शनिवारी सकाळी कचरा टाकण्याच्या कारणावरून पुन्हा वाद झाल्यानंतर हातोडा व चाकूने हल्ला करून तेथून पळून गेल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास एमआयडीसी कुपवाड पोलीस करीत आहेत.

या कारवाईत पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल माने, सुशिल मस्के, सागर लवटे, संदीप नलावडे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील जाधव, विनायक सुतार, ऋतुराज होळकर व सुमित सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
कणकवलीतील जुगार कारवाईवर पालकमंत्री नितेश राणेंचा थेट इशारा; ‘ संशयित आरोपींना मदत करणारे एकही अधिकारी-कर्मचारी सुटणार नाही’ | सांगली एलसीबीची धडाकेबाज कारवाई; खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या दोन तासांत जेरबंद | असलदे पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार नांदगावच्या पोलीस पाटलांकडे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे आदेश; | नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर तळेरे बाजारपेठेत नागमूर्त्या दाखल; चाकरमान्यांचीही गावाकडे लगबग | तासगाव पोलिसांची दमदार कामगिरी; अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा तीन दिवसांत छडा, गुजरातमधून आरोपी जेरबंद | स्व. प्राचार्य सुब्राव बंडगर सर स्मृती ग्रंथ 'माणहिरा' चे आज अनकटाळमध्ये प्रकाशन व अभ्यासाचे उद्घाटन | वैभववाडी बसस्थानकाच्या समस्यांवर   जि प सदस्य प्रमोद रावराणे आक्रमक विभागीय नियंत्रकांना निवेदन; १८ ऑगस्टला प्रत्यक्ष पाहणीचे आश्वासन | गुरे आडवी आल्याने डंपर पलटी; सहा प्रवासी बचावले कोल्हापूर-तळेरे मार्गावर एडगाव-रामेश्वरवाडी येथे अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली | गोंधळी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी इंगळे यांचे निधन | एमपीएससीच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली; अंतिम उत्तरतालिकेला दोन महिने उलटूनही जीएमएलची प्रतीक्षा |