२० वर्षांच्या प्रतीक्षेनंतरचा रस्ता पहिल्याच पावसात उखडला!
👤 तुषार शिंगाडे |
📅
12 August 2026 |
👁 98 Views
कणकवली, दि. १२ ऑगस्ट (प्रतिनिधी) : कळसुली, उत्तमनगर, हुंबरवाडी परिसरातील देंदोनवाडी प्रकल्पाला १९९० मध्ये मंजुरी मिळाल्यानंतर हुंबरवाडीतील काही कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यानंतर स्वेच्छा पुनर्वसनाच्या माध्यमातून काही कुटुंबांनी येथे घरे उभारून वास्तव्यास सुरुवात केली. मात्र, पुनर्वसन क्षेत्रातील मूलभूत सुविधांचा प्रश्न आजही कायम असल्याचे चित्र आहे. तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर करण्यात आलेले पणदूर-घोडगे राज्य महामार्गाला जोडणाऱ्या सुमारे दोन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण पहिल्याच पावसात उखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
देंदोनवाडी प्रकल्पामुळे पणदूर-घोडगे राज्य महामार्गाचा काही भाग बुडीत क्षेत्रात गेला आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून स्वेच्छा पुनर्वसनातून जाणाऱ्या या रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, रस्त्यासाठी ग्रामस्थांना अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागली. रस्ता पूर्ण करण्यासाठी आंदोलन तसेच उपोषणाचा मार्गही स्वीकारावा लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मे महिन्यात रस्ता; पावसाळ्यात पुन्हा खड्डे
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी मे महिन्यात लघु पाटबंधारे विभागाकडून रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, पावसाळा सुरू होताच अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याला आवश्यक बेस, खडीकरण व मजबुतीकरण न करता केवळ डांबरीकरण करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वापरण्यात आलेल्या डांबराच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
“२००५ मध्ये पुनर्वसन झाल्यापासून या भागात अनेक सुविधांचा अभाव आहे. यंदा मे महिन्यात रस्ता झाला; मात्र काही महिन्यांतच रस्त्याची दुरवस्था झाली. रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून जाणेही धोकादायक झाले आहे,” असा संताप महिलांनी व्यक्त केला.
रस्ता खराब झाल्याने एसटी वाहतूक बंद
या रस्त्याचा वापर पुनर्वसन क्षेत्रातील जवळपास ४० कुटुंबे करत आहेत. रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने एसटी वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध तसेच कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
“रस्ता नादुरुस्त असल्यामुळे एसटी येत नाही. शाळेत जाणाऱ्या मुलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. एसटीला वळण घेण्यासाठीही अडचणी येतात. रस्त्यावर मोठी वळणे, चढ-उतार आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित आहे की नाही, याची संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तक्रारी करूनही दखल नसल्याचा आरोप
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची माहिती लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी फोन करून देण्यात आली. मात्र, त्यानंतरही रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्वेच्छा पुनर्वसनातील महिलांनी केला आहे.
रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने झाले नसल्याने काही महिन्यांतच त्याची पोलखोल झाली आहे. आवश्यक दगड-खडीचा मजबूत बेस न करता डांबरीकरण करण्यात आल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
गणपती आगमनापूर्वी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची दुरवस्था अधिक चिंतेचा विषय ठरत आहे. “याच खड्ड्यांतून गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. वयोवृद्ध नागरिक, महिला आणि लहान मुलांनी या रस्त्यावरून कसे जावे?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
धरणाचे पाणी महामार्गावर आल्यास पर्यायी मार्ग ठरणार
देंदोनवाडी धरणाचे पाणी पणदूर-घोडगे राज्य महामार्गावर आल्यास स्वेच्छा पुनर्वसनातून जाणारा हा रस्ता पर्यायी मार्ग म्हणून महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे केवळ पुनर्वसन क्षेत्रातील ग्रामस्थांसाठीच नव्हे, तर भविष्यातील वाहतुकीच्या दृष्टीनेही या रस्त्याची गुणवत्ता आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे.
लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विभागाची तातडीने पाहणी करावी आणि रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने करून कायमस्वरूपी वाहतुकीस योग्य रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.