जत : राजे रामराव महाविद्यालय, जत येथील ग्रंथालय विभाग, भाषा विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने 'मुक्तपीठ' या उपक्रमांतर्गत "महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे : प्रभावी अंमलबजावणी की केवळ कागदोपत्री व्यवस्था?" या विषयावर परिसंवाद उत्साहात व विचारमंथनाच्या वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. दीपा गणेश चौंदीकर, असिस्टंट पब्लिक प्रोसिक्यूटर, जत यांनी महिलांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेल्या विविध कायद्यांची माहिती देताना, "कायदे हे महिला व पुरुषांसाठी समान आहेत. त्यामुळे कायद्याच्या समोर कोणीही मोठा किंवा छोटा नसतो. महिलांच्या संदर्भातील कायदे प्रभावी असले तरी त्यांची काटेकोर अंमलबजावणी आणि समाजातील प्रत्येक घटकाची जागरूकता यांशिवाय महिलांना न्याय मिळणे शक्य नाही. कायद्यांचे ज्ञान आणि योग्य वेळी तक्रार करण्याचे धैर्य हीच महिलांच्या सक्षमीकरणाची खरी ताकद आहे," असे प्रतिपादन केले.
दुसऱ्या प्रमुख पाहुण्या सौ. श्रद्धा मंगेश शिंदे, अध्यक्षा, महिला दक्षता समिती, जत पोलीस स्टेशन यांनी "महिलांनी अन्याय सहन न करता तात्काळ कायदेशीर मदत घ्यावी. समाजानेही महिला सुरक्षेबाबत संवेदनशील राहून सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा," असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. के. के. रानगर होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांनी कायद्यांविषयी जागरूक राहून सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी आणि स्त्री-पुरुष समानतेची मूल्ये आचरणात आणावीत, असे सांगितले. त्याचबरोबर याविषयी माहिती देताना ते म्हणाले, "शिक्षणमहर्षीं डॉ. बापूजी साळुंखे यांनी सांगितल्याप्रमाणे लोक सुसंस्कारित झाले तर स्त्रियांवर अन्याय होणार नाहीत. खऱ्या अर्थाने सुसंस्कारित माणूस हा शिक्षणातूनच घडत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बापूजींच्या तत्त्वज्ञानाशी एकरूप व्हावे."
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. के. के. रानगर होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांनी कायद्यांविषयी जागरूक राहून सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी आणि स्त्री-पुरुष समानतेची मूल्ये आचरणात आणावीत, असे सांगितले. त्याचबरोबर याविषयी माहिती देताना ते म्हणाले, "शिक्षणमहर्षीं डॉ. बापूजी साळुंखे यांनी सांगितल्याप्रमाणे लोक सुसंस्कारित झाले तर स्त्रियांवर अन्याय होणार नाहीत. खऱ्या अर्थाने सुसंस्कारित माणूस हा शिक्षणातूनच घडत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बापूजींच्या तत्त्वज्ञानाशी एकरूप व्हावे."परिसंवादामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न उपस्थित केले. प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या शंकांचे समाधानकारक निरसन करत कायदेशीर प्रक्रिया, महिलांचे अधिकार आणि नागरिकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. रोहिणी शिंदे यांनी तर आभार डॉ. सलीम पठाण यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथालय विभाग व मुक्तपीठ समितीने परिश्रम घेतले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.