ऋणानुबंध महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
बचतगटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम होत असून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होऊन स्वावलंबनातून नेतृत्व गुण निर्माण होत असल्याचे मत मालवण पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे यांनी ऋणानुबंध महिला प्रभाग संघ आचराच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केले.यावेळी त्यांच्या हस्ते ऋण संजीवनी वैयक्तिक कर्ज योजनेचे अनावरण करण्यात आले.
सक्षम नारी, स्वावलंबी कुटुंब आणि त्यातून उभे राहिलेले समृद्ध गाव हे अंतिम ध्येय घेऊन कार्य करणाऱ्या
ऋणानुबंध महिला प्रभाग संघ आचराची ४थी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी लौकिक सांस्कृतिक भवनात उत्साहात संपन्न झाली.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी त्यांच्या सोबत
तालुका अभियान व्यवस्थापक रविकिरण काबंळी व तालुका व्यवस्थापक स्नेहल साळवी, आचरा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिनाक्षी देसाई, ऋणानुबंध महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा सौ शितल आचरेकर, सचिव सौ रेश्मा मेस्त्री, कोषाध्यक्ष सौ नंदिनी पांगे, मंजिरी राणे,हिमाली अमरे, राजश्री कोदे खेडेकर, बँक ऑफ महाराष्ट्र च्या क्षमा कारेकर, वैशाली हिर्लेकर,पुजा सुतार
यांच्या सह अन्य पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य,सीआरपी,ग्रामसंघ लिपिका,बॅंक सखी, आदीसह बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रच्या क्षमा कारेकर यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली.तर उमेद अभियान व्यवस्थापक रविकिरण कांबळी यांनी महिला बचत गटांचे सक्षमीकरण, स्वयंरोजगार, आर्थिक स्वावलंबन व संघटन बळकटीकरणा संदर्भात मार्गदर्शन केले.तालुका व्यवस्थापक स्नेहल साळवी यांनीही या वेळी मार्गदर्शन केले.या सभेत मागील आर्थिक वर्षाचा जमा-खर्चाचा अहवाल सादर करून सर्वानुमते मंजूर करण्यात आला. आगामी आर्थिक वर्षातील वार्षिक नियोजन व विकासात्मक उपक्रमांना मान्यता देण्यात आली. प्रभागसंघाच्या कामकाजाचा आढावा घेऊन भविष्यातील उद्दिष्टे निश्चित करण्यात आली. प्रभागसंघाच्या नफ्यातून "ऋण संजीवनी" वैयक्तिक कर्ज योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.या योजनेमुळे बचतगटातील महिलांना तातडीच्या गरजांसाठी सुलभ आर्थिक मदत मिळणार असून, व्यवसायालाही चालना मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी महिला आर्थिक सक्षमीकरण, स्वयंरोजगार आणि विविध उपजीविका उपक्रमांवर विशेष भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व ग्रामसंघ, बचतगट, पदाधिकारी आणि सदस्य यांच्या सहकार्यामुळे प्रभागसंघ अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी उद्दिष्ट केवळ बचतगट चालविणे नाही, तर प्रत्येक महिलेला 'लखपती दीदी' बनवून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे आणि ऋणानुबंध महिला प्रभागसंघाला आदर्श प्रभागसंघ म्हणून घडविणे हे उद्दिष्ट घेऊन कार्य करण्याचा यावेळी निर्धार करण्यात आला.
यावेळी बचतगटांनी बनवलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल लक्ष वेधून घेत होते.यात आकर्षक पॅकिंग मधील आश्चर्यकारक फोटो खाद्य पदार्थांसोबत साबण,मच्छर अगरबत्ती, विविध तेल आदी नाविन्यपूर्ण प्राॅडक्ट महिला बचतगटांची उद्यमशीलता दाखवून देत होती.