झरे येथे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

👤 नंदकुमार विभुते आटपाडी | 📅 03 August 2026 | 👁 106 Views
झरे येथे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
आटपाडी तालुका साहित्य मंच, खानापूर-कडेगाव तालुका साहित्य परिषद आणि झरे पंचक्रोशी जनता विद्यालय, झरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाच्या प्रांगणात अत्यंत उत्साहपूर्ण, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाले. संमेलनाचे उद्घाटन उद्घाटक ॲड. सुभाषबापू पाटील यांच्या हस्ते भारतीय राज्यघटना आणि संत तुकाराम महाराज यांच्या गाथा ग्रंथाचे श्रद्धापूर्वक पूजन तसेच दीपप्रज्वलन करून करण्यात आले. दिवसभर साहित्यिक चर्चा, पुस्तक परिचय, विशेष सत्कार, विनोदी कथाकथन आणि बहारदार कवीसंमेलनामुळे साहित्यप्रेमींना समृद्ध साहित्यिक पर्वाचा आनंद अनुभवता आला.

संमेलनाच्या प्रारंभी प्रा. सुनील दबडे यांनी प्रास्ताविकातून संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका, उद्दिष्टे आणि ग्रामीण भागात साहित्य चळवळ अधिक सक्षम करण्यामागील विचार मांडले. अशा साहित्य संमेलनांमुळे नवोदित लेखक, कवी आणि वाचकांना एकत्र येण्याची संधी मिळते तसेच साहित्यिक संस्कारांची जोपासना अधिक प्रभावीपणे होते, असे त्यांनी सांगितले.

स्वागताध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे यांनी स्वागतपर भाषणातून झरे व पंचक्रोशीच्या सामाजिक, ऐतिहासिक आणि साहित्यिक परंपरेचा समृद्ध वारसा उलगडून सांगितला. परिसरातील शेती, उद्योग, व्यापार, लोकसंस्कृती आणि सामाजिक जडणघडणीचा वेध घेत त्यांनी झरेच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रभावी चित्र उपस्थितांसमोर उभे केले. साहित्य आणि संस्कृती यांचा परस्परांशी असलेला दृढ संबंध त्यांनी प्रभावी शब्दांत अधोरेखित केला.

संमेलनाचे उद्घाटक ॲड. सुभाषबापू पाटील यांनी उद्घाटनपर भाषणात ग्रामीण भागातील साहित्य संमेलने ही नवोदित लेखक, कवी आणि साहित्यप्रेमींसाठी प्रेरणादायी व्यासपीठ असल्याचे सांगितले. साहित्य समाजाला दिशा देणारे प्रभावी माध्यम असून ग्रामीण प्रतिभेला अशा संमेलनांतून व्यापक व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. सयाजीराजे मोकाशी यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाला वैचारिक उंची प्राप्त झाली. त्यांनी मराठी साहित्याची समृद्ध परंपरा, समाजप्रबोधनातील साहित्याची भूमिका आणि बोलीभाषेचे महत्त्व यावर सखोल भाष्य केले. नव्या पिढीने मायबोलीच्या जतन-संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करत साहित्य हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संमेलनाच्या पहिल्या सत्रात साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ लेखक विलास खरात यांना 'आकुबा' कथासंग्रहासाठी मिळालेला 'गावगाडा पुरस्कार' आणि 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप अवॉर्ड–२०२६', रमेश जावीर यांच्या 'गुलामीचा जिना' व 'कोलदांडा' या साहित्यकृतींना मिळालेले पुरस्कार, प्रा. सुनील दबडे यांच्या 'बनगी आणि बिरमुटं' या कथासंग्रहाला मिळालेले सहा पुरस्कार तसेच रघुनाथ मेटकरी यांच्या 'माझे विद्यार्थी' या पुस्तकाचा विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात झालेला समावेश याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय कवी शिवाजी बंडगर यांच्या 'फुले फुलताना' या पुस्तकाचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश, प्रा. विश्वनाथ गायकवाड यांना 'निसर्ग मित्र पुरस्कार', दिनेश देशमुख यांना 'वाचन कार्यकर्ता पुरस्कार' आणि कवी ज्ञानेश डोंगरे यांनी 'वारी माझ्या दारी' या उपक्रमांतर्गत सलग १९ दिवसांत १९ कविता सादर केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी लेखक, कवी आणि पुस्तकांचा परिचय तसेच त्यावरील विचारमंथन पार पडले. कवी सुधाकर इनामदार यांच्या "मी चंदन व्हाया बघतो" या पुस्तकावर प्रा. विश्वनाथ गायकवाड यांनी विचार मांडले. लेखक प्रा. सुनील दबडे यांच्या "बनगी आणि बिरमुटं" या कथासंग्रहावर प्रा. अरुण कांबळे यांनी विवेचन केले. प्रा. साहेबराव चवरे यांच्या "वानुळा" या पुस्तकावर प्रा. श्रीकृष्ण पडळकर यांनी समीक्षा सादर केली, तर जयसिंग देशमुख यांच्या "माझ्या लेकी" या पुस्तकावर प्रा. विजय शिंदे यांनी अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.

दुसऱ्या सत्रात कथाकथनकार जीवन सावंत यांनी आपल्या खुमासदार शैलीत रसिकांचे मन जिंकले. त्यानंतर कवी सुनील जवंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली रंगलेल्या बहारदार कवीसंमेलनात रघुनाथ मेटकरी, रमेश जावीर, शिवाजी बंडगर, विजय पवार, व्ही. एन. देशमुख, स्मिता साळुंखे, मेघाताई पाटील, पुष्पाताई मिसाळ, विद्या शेळके, अरुण कांबळे, प्रा. विजय शिंदे, विश्वनाथ गायकवाड, विलास खरात, सुनील सावंत, सुशीला नांगरे-पाटील, डॉ. आरती माळी आदी कवींनी सामाजिक आशय, मानवी मूल्ये आणि जीवनानुभव व्यक्त करणाऱ्या कविता सादर करून रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.

या संपूर्ण सोहळ्यास जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था, झरेचे उपाध्यक्ष भालचंद्र मेटकरी, सचिव भीमाशंकर स्वामी यांच्यासह दिनेश देशमुख, ज्ञानेश डोंगरे, भरत पाटील, शिकलगार सर आणि दिलीप कटरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. अत्यंत नियोजनबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या साहित्य संमेलनाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. मेघाताई पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवर, साहित्यिक, कवी, रसिक आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
सामाईक विहिरीवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू | सावळजमध्ये साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप | ग्रामीण मातीतला ओम आज ‘टीम इंडिया’चा स्टार; व्हॉलीबॉलच्या स्वप्नाला मिळाली आंतरराष्ट्रीय भरारी | झरे येथे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न | तासगाव तालुक्यात समन्यायी पाणी वाटपाची गरज; "शेतकऱ्यांना न्याय्य पाणी कधी मिळणार?" – डॉ. भारत पाटणकर | 9 ऑगस्ट ला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आष्टा नगरीत | ऊसतोड कामगाराचा मुलगा ते शिवछत्रपती पुरस्कार विजेता; शंकर गदईंचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर | आचरा गावातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करा; अन्यथा १५ ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा इशारा | मालवण बंदरा येथील पोर्टा केबिनचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन | प्रशासनाने अधिक गतीने काम करत शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात पालकमंत्री नितेश राणे |