महसूल विभाग हा शासन आणि जनतेमधील विश्वासाचा मजबूत दुवा पालकमंत्री नितेश राणे

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 02 August 2026 | 👁 43 Views
महसूल विभाग हा शासन आणि जनतेमधील विश्वासाचा मजबूत दुवा पालकमंत्री नितेश राणे
महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
महसुल विभाग हा शासन आणि जनता यांच्यामधील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. जन्म दाखल्यापासून ते शेतजमिनीच्या नोंदीपर्यंत सामान्य नागरिकांच्या जीवनाशी महसूल विभागाचा थेट संबंध येतो. त्यामुळे या विभागाने केवळ प्रशासकीय जबाबदारी न पार पाडता जिल्ह्याच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृह येथे आयोजित महसूल दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष साटविलकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, प्रभाकर सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.

महसूल दिनाच्या शुभेच्छा देताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, महसूल विभागाचा सामान्य नागरिकांच्या आयुष्याशी थेट संबंध आहे. नागरिकांच्या अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये महसूल विभागाची भूमिका केंद्रस्थानी असते. जनतेच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविणारा हा विभाग असून, प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करण्याची जबाबदारी महसूल यंत्रणेची आहे. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक गौरव केल्याने त्यांचे मनोबल वाढेल, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तळागाळातील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे समाधान करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टिकोन आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून द्याव्यात.

शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, पारदर्शक प्रशासन राबविणे आणि नागरिकांना वेळेत सेवा देणे ही महसूल विभागाची महत्त्वाची जबाबदारी आहे. पुढील काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विभागीय स्तराप्रमाणेच राज्य स्तरावरही उत्कृष्ट कामगिरीचा लौकिक निर्माण करावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महसूल विभागात पारदर्शकता ठेवत मंत्रीमंडळाच्या संमतीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेही पालकमंत्री नितेश राणे यांनी अभिनंदन केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पुरस्कारप्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोकाभिमुख उपक्रमांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

*उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव*

यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

गौरव करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये उपजिल्हाधिकारी आरती देसाई, तहसीलदार सूर्यकांत पाटील, चैताली सावंत, निवासी नायब तहसीलदार रवींद्र निपाणीकर, मंडल अधिकारी विनायक कोदे, संजीवनी खानोलकर, महसूल सहाय्यक महादेव बाबर, लघुलेखक महेश जाधव, ग्राममहसूल अधिकारी गौरव दळवी, किरण अभंग, शांतेश नाडकर्णी, महसूल सेवक योगेश वेंगुर्लेकर, संतोष नाईक, सुरेंद्र पेडणेकर, पोलीस पाटील वैभव धुरी, मोहन सावंत, शिपाई अजिमल्ली खान आगा, नाईक रामकृष्ण जाधव, राजेश शिरवळकर यांचा समावेश आहे.

तसेच महसूल कोकण विभाग स्तरावर गौरविण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, मालवणच्या नायब तहसीलदार (संजय गांधी) प्रिया हरणे, जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी निलेश वेरूळकर, कुडाळचे मंडल अधिकारी पी. डी. मसूरकर, महसूल सहायक गोपालसिंग राजपूत आणि वाहन चालक अमित घाडीगावकर यांचा समावेश आहे.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नितीन नाईक, अंकिता आणावकर, रसिका सावंत आणि हेमलता राऊत यांना दिव्यांग पालकत्व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

लोकाभिमुख प्रशासनाचा कणा म्हणून महसूल विभागाची भूमिका

भारतीय स्वातंत्र्यलढ्यापासून ते आधुनिक प्रशासनापर्यंत महसूल विभागाने लोकाभिमुख शासनव्यवस्थेचा कणा म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक प्रशासन, नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देणे आणि शासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी महसूल विभाग सातत्याने कार्यरत आहे. या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट रोजी राज्यभर महसूल दिन साजरा केला जातो.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी महसूल विभागाच्या विविध शाखांमार्फत राबविण्यात येणाऱ्या कामकाजाचा व उल्लेखनीय उपक्रमांचा आढावा घेतला.

कार्यक्रमाचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी मानले. सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ऊसतोड कामगाराचा मुलगा ते शिवछत्रपती पुरस्कार विजेता; शंकर गदईंचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर | आचरा गावातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करा; अन्यथा १५ ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा इशारा | मालवण बंदरा येथील पोर्टा केबिनचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन | प्रशासनाने अधिक गतीने काम करत शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात पालकमंत्री नितेश राणे | भगवान गौतम बुद्ध हेच खरे विश्वगुरू जानवलीच्या बुद्ध विहारात आषाढी पौर्णिमेचा प्रारंभ दिन कार्यक्रम | प्रवासी हेच आपले दैवत"हे ब्रीद अंगिकारुन संतोष भाट यांनी एसटी गाड्यांच्या दुरुस्तीचे काम अत्यंत चोख आणि जबाबदारीने पार पाडले - श्रीनिवास कदम | महसूल विभाग हा शासन आणि जनतेमधील विश्वासाचा मजबूत दुवा पालकमंत्री नितेश राणे | आगाऊ धान्य वितरणाच्या निर्णयाचा पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला सखोल आढावा | पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक .. | अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांचा ठाम विरोध असताना तो मोडून काढण्यासाठी राज्य सरकार ,प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत आहेत |