ठमकेवाडी फाटा (ता. शाहूवाडी) येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त साई मंगलधाम कार्यालयात 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे' उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
या शिबिरात शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांना देण्यात आली. तसेच ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी, बचत गट आदी लाभार्थ्यांना विविध योजनांचे मंजुरीपत्र व साहित्याचे वितरण करण्यात आले. शासनाच्या योजना प्रभावीपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आमदार डॉ. विनय कोरे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पन्हाळा तालुक्यातील सातवे गावातील तब्बल ३० ते ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गावठाण विस्तार योजनेतील भूखंडांच्या शर्तभंग नियमानुकूल आदेशांचे १०५ लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला.
यावेळी विविध मान्यवरांनी शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आर्थिक व सामाजिक प्रगती साधण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास गोकुळ दूध संघाचे संचालक कर्णसिंह गायकवाड, सर्जेराव पाटील (पेरिडकर), स्नेहल वेल्हाळ, प्रियांका भोसले, अमरसिंह खोत, सुरेश पवार, रणजीत शिंदे, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार शुभांगी जाधव, तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार, सोनाली माडकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, नागरिक आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.