मुसळधार पावसाने विधवा महिलेचे घर कोसळले; आमदार हरिश्चंद्र भोये यांची तात्काळ मदत
👤 प्रतिनिधी – जितेंद्र मोरघा |
📅
02 August 2026 |
👁 629 Views
मुसळधार पावसामुळे जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत दसकोड हद्दीतील मोर्चापाडा येथे सौ. काकडी भास्कर पोटिंदा या विधवा महिलेचे घर कोसळल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली.
घटनेची माहिती मिळताच विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी बाधित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच त्यांना धीर देत तात्काळ आर्थिक मदत प्रदान केली.
शासनाच्या नैसर्गिक आपत्ती मदत योजनेअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या सर्व शासकीय लाभांचा लाभ बाधित कुटुंबाला तातडीने मिळावा, यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही त्वरित सुरू करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांनी आमदार हरिश्चंद्र भोये यांनी आपत्तीग्रस्त कुटुंबाला दिलेल्या तत्पर मदतीबद्दल समाधान व्यक्त करत, शासनाकडूनही नुकसानभरपाई व इतर आवश्यक मदत लवकर मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.