जत, दि. १(प्रतिनिधी ): राजे रामराव महाविद्यालय, जत येथील सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लेखन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. के. के. रानगर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यप्रेमी श्री. दिनराज वाघमारे उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रा. के. के. रानगर यांनी सांगितले, "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ वाचनापुरते मर्यादित नसून ते सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारे आहे. विद्यार्थ्यांनी लेखन, वाचन आणि चिंतनाची सवय जोपासून समाजाभिमुख दृष्टी विकसित केली तरच शिक्षणाचे खरे सार्थक होईल."
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे श्री. दिनराज वाघमारे म्हणाले, "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे कष्टकरी, शोषित आणि पीडित समाजाच्या वेदना, संघर्ष व स्वाभिमानाचे जिवंत प्रतिनिधित्व करणारे आहे. त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू माणूस आणि मानवताच राहिलेला आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेत सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रनिर्मितीत सक्षम व सुसंस्कृत नागरिक म्हणून योगदान द्यावे."अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रा. के. के. रानगर यांनी सांगितले, "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ वाचनापुरते मर्यादित नसून ते सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारे आहे. विद्यार्थ्यांनी लेखन, वाचन आणि चिंतनाची सवय जोपासून समाजाभिमुख दृष्टी विकसित केली तरच शिक्षणाचे खरे सार्थक होईल."
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी केले. त्यांनी लेखन प्रेरणा दिनाचे महत्त्व स्पष्ट करून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक व परिवर्तनवादी कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. रोहिणी शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.