सांगली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या ईश्वरपूर नगराध्यक्ष प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. नगरविकास विभागाने ईश्वरपूरचे नगराध्यक्ष श्री. आनंदराव संभाजी मलगुंडे यांना अपात्र ठरविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.
जिल्हाधिकारी, सांगली यांनी महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम 1965 मधील कलम 44(1)(ई) अन्वये दि. 10 जुलै 2026 रोजी श्री. आनंदराव मलगुंडे यांना अपात्र ठरविण्याचा आदेश दिला होता. या आदेशाविरोधात मलगुंडे यांनी दि. 16 जुलै 2026 रोजी कलम 44(4) अन्वये शासनाकडे अपील दाखल केले होते. तसेच अपीलाच्या अंतिम निर्णयापर्यंत अपात्रतेच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणीही केली होती.
या अपीलावर सुनावणीसाठी दि. 30 जुलै 2026 ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र अपरिहार्य कारणास्तव ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
दरम्यान, नगरविकास विभागाने आज जारी केलेल्या पत्रानुसार, सक्षम प्राधिकारी तथा उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांच्या निर्देशानुसार अपीलाचा अंतिम निर्णय होईपर्यंत जिल्हाधिकारी सांगली यांनी दि. 10 जुलै 2026 रोजी काढलेला श्री. आनंदराव संभाजी मलगुंडे यांच्या अपात्रतेचा आदेश स्थगित करण्यात आला आहे.
नगरविकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांच्या स्वाक्षरीचे पत्र जिल्हाधिकारी, सांगली यांना पाठविण्यात आले आहे. या निर्णयामुळे ईश्वरपूर नगराध्यक्ष प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पुढील सुनावणी आणि शासनाच्या अंतिम निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.