ठेकेदारांना अभय, नागरिकांना त्रास'

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 28 July 2026 | 👁 79 Views
ठेकेदारांना अभय, नागरिकांना त्रास'
देवगड-जामसंडे नगर पंचायतीच्या मासिक सर्वसाधारण सभेत रखडलेल्या विकासकामांपासून ते पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या वाढीव किमतीपर्यंत अनेक विषयांवर जोरदार खडाजंगी झाली. अर्धवट विकासकामे, रस्त्यांवरील खड्डे, ठेकेदारांना दिली जाणारी वारंवार मुदतवाढ, सफाई व्यवस्थेतील त्रुटी, मोकाट गुरांचा प्रश्न आणि पवनचक्की गार्डनमधील पार्किंग व्यवस्था या मुद्द्यांवर नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत तीव्र नाराजी व्यक्त केली.
नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपनगराध्यक्षा मिताली सावंत, बांधकाम समिती सभापती रोहन खेडेकर, आरोग्य व स्वच्छता समिती सभापती बुवा तारी, पाणीपुरवठा समिती सभापती तन्वी चांदोस्कर, मुख्याधिकारी गौरी पाटील, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते.
सभेत नगरसेवक नितीन बांदेकर यांनी अर्धवट अवस्थेत पडून असलेल्या विकासकामांबाबत प्रशासनावर जोरदार टीका केली. ठेकेदार वेळेत काम पूर्ण करत नसतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता वारंवार मुदतवाढ दिली जाते. त्यामुळे नगर पंचायतीची प्रतिमा मलिन होत असून अशा ठेकेदारांविरुद्ध फौजदारी कारवाई का केली जात नाही, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरही प्रशासनाला जाब विचारण्यात आला. मागील सभेत आठवडाभरात खड्डे बुजविण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात आजही अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. सकाळी बुजवलेले खड्डे सायंकाळपर्यंत पुन्हा उघडे पडत असल्याची टीका करण्यात आली. स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत कावले यांनी, "एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?" असा संतप्त सवाल उपस्थित केला. नगरसेविका अॅड. प्रणाली माने यांनीही प्राधान्याने खड्डे बुजविण्याची मागणी केली. यावर नगराध्यक्षा साक्षी प्रभू व अभियंता विवेक खोत यांनी आवश्यक ठराव होताच काम तातडीने सुरू केले जाईल, असे स्पष्ट केले.
पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या वाढीव किमतींचा मुद्दाही सभेत चांगलाच गाजला. जामसंडे येथील गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांना पूर्वीपेक्षा अधिक किंमत सांगितली जात असल्याने गरीबांसाठी परवडणाऱ्या घरांचा मूळ उद्देशच धोक्यात आल्याचा आरोप नितीन बांदेकर यांनी केला. या संदर्भातील बैठकीस नगरसेवकांनाच निमंत्रित न केल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. अॅड. प्रणाली माने यांनीही वाढीव किमतीमुळे लाभार्थी मागे हटत असल्याचे सांगितले. यावर मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी म्हाडाने निश्चित केलेल्या दरानुसारच घरे देण्यात येणार असून सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि लाभार्थ्यांची संयुक्त विशेष बैठक आयोजित केली जाईल, अशी ग्वाही दिली.
सफाई व्यवस्थेवर चर्चा करताना काही कंत्राटी सफाई कर्मचारी कामात हलगर्जीपणा करत असून काही कर्मचारी मद्यधुंद अवस्थेतही सेवेत हजर राहत असल्याचा गंभीर आरोप स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत कावले यांनी केला. लेखी तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुकादमाकडून नगरसेवकांनाच धमक्या दिल्या जात असल्याचा गौप्यस्फोट केला. यावर नगराध्यक्षा साक्षी प्रभू व मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी कामचुकार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केले जाईल, तर कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांविरोधात वरिष्ठ स्तरावर कारवाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे स्पष्ट केले.
पवनचक्की गार्डन परिसरातील वाहनतळासाठी आवश्यक जमीन मोजणी पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याची सूचना सभापती बुवा तारी यांनी केली. तसेच मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना सुरू असून गुरांना टॅग लावण्यास नकार देणाऱ्या मालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिली. याशिवाय नगर पंचायतीच्या हद्दीतील लघुनळ योजनांसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीने राबविण्याचा महत्त्वपूर्ण ठराव सभागृहाने मंजूर केला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
पंढरीच्या वारीत 'मुक्या' जीवांची अनोखी विठ्ठल सेवा | सोलापूर विद्यापीठात १५० कंत्राटी पदांची भरती; नव्या निविदेची प्रक्रिया सुरू | सोलापूरच्या शासकीय हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; १२ वी नंतर उज्ज्वल करिअरची सुवर्णसंधी | कारगिल विजय दिवसाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापुरात कारगिल शहीदांना सैनिकांच्या शिस्तबद्ध शैलीत मानवंदना | ठेकेदारांना अभय, नागरिकांना त्रास' | पीक विम्यात देवगडच्या शेतकऱ्यांवर अन्याय; कृषी अधिकाऱ्यांना सभागृहात धारेवर | वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तब्बल आठ तासाने मिळाला मृतदेह..... | पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने करुळ येथील शेतकरी बेपत्ता | ओटभरणी समारंभात रुजवले संस्कारांचे बीज! | अनुसयामाता विश्रांतीधाम आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव |