इस्रो (ISRO) आणि नासा (NASA) स्पेस रिसर्च सेंटर भेट कार्यक्रम २०२६-२७ अंतर्गत उमेदवार निवड परीक्षा शनिवारी, दि. २५ जुलै २०२६ रोजी विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक महाविद्यालय, इंदापूर येथे यशस्वीरित्या पार पडली.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञानाविषयी आवड निर्माण करून त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्थांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने या निवड परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षा संपूर्णपणे नियोजनबद्ध व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.
या निवड परीक्षेसाठी इंदापूर तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमधील एकूण ७१ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
या परीक्षेचे समन्वयक प्रा. संतोष देवकते यांनी परीक्षेचे नियोजन, विद्यार्थ्यांचे स्वागत, परीक्षा प्रक्रिया तसेच सर्व व्यवस्थापन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडले. महाविद्यालयातील व्याख्याता प्रा . सदानंद भुसे , प्रा . अमोल जगताप व इतर सहकारी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे परीक्षा सुरळीत आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाली.
इस्रो व नासा स्पेस रिसर्च सेंटर भेट कार्यक्रमासाठी उमेदवारांची निवड स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येत असून, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, संशोधन आणि अंतराळ तंत्रज्ञानाबाबतची आवड अधिक वृद्धिंगत होण्यास मदत होत आहे.