देवगड तालुक्यातील तोरसोळे राणेवाडी येथे बिबट्याने गोठ्यात शिरून वासरावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाला असून शेतकरी अशोक अनंत सावंत यांचे सुमारे ₹५ हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री अशोक सावंत यांच्या गोठ्यातील सहा गुरे अचानक मोठमोठ्याने हंबरू लागली. संशय आल्याने त्यांनी तातडीने गोठ्याकडे धाव घेतली. त्यावेळी बिबट्याने वासराच्या मानेवर हल्ला केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सावंत यांनी हातातील दांड्याच्या सहाय्याने बिबट्याला हुसकावून लावले. मात्र, तोपर्यंत वासराचा गंभीर जखमांमुळे मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शेतकरी आपल्या जनावरांच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहेत. वारंवार होत असलेल्या बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
ग्रामस्थांनी वन विभागाने घटनास्थळी पंचनामा करून नुकसानभरपाईची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, तसेच परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.