स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'जनसेवा सप्ताह' उपक्रमांतर्गत माण-खटाव तालुक्यात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. येळेवाडी (ता. माण) येथील श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळेतील अनाथ व निराधार मुलांना स्नेहभोजन देण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शिक्षण, संस्कार आणि आत्मविश्वासाच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश दिला.
यावेळी उत्तर माण नेते पिंटू जगदाळे, आनंदराव विरकर, राजेंद्र देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान मोर्चा सातारा जिल्हा कार्याध्यक्ष तुषार भोसले, आप्पासाहेब देशमुख, संत गाडगेबाबा मिशनचे संचालक शिवाजीराव महानवर, वैभव महानवर , शत्रुघ्न भोसले,यशवंत शिनगारे, प्रज्वल भोसले, विशाल जगदाळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश (किसान मोर्चा) प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. अभिजित घोरपडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. समाजातील वंचित आणि गरजू घटकांप्रती संवेदनशीलता जपत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना समाजसेवेच्या माध्यमातून अभिवादन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
स्नेहभोजन कार्यक्रमात आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेमाने भोजन वाढण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची विचारपूस करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी मुलांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. कार्यक्रमामुळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून आले.
यापूर्वी जनसेवा सप्ताहांतर्गत दहिवडी शहरात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण तसेच पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम राबविण्यात आले. दहिवडी बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, तर ग्रामीण रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. या सर्व उपक्रमांना कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच माण-खटाव तालुक्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. अभिजित घोरपडे म्हणाले, "स्वर्गीय अजितदादा पवार यांनी समाजहित, जनसेवा आणि सर्वसामान्यांच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले. त्यांच्या जयंतीनिमित्त समाजातील गरजू घटकांसाठी उपयुक्त ठरणारे उपक्रम राबविणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे. जनसेवा सप्ताहाच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्याची परंपरा पुढेही कायम ठेवली जाईल.