दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील मारहाणीविरोधात तासगावात भर पावसात बेमुदत धरणे आंदोलन
👤 संतोष एडके तासगाव |
📅
22 July 2026 |
👁 544 Views
दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष मारहाणीचा तसेच सरकारच्या हुकूमशाही भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी तासगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरा भर पावसात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनात स्थानिक सुधार समितीचे अध्यक्ष संदेश भंडारे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुरण मलमे, प्रमोद सावंत, राहुल माने, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे निलेश गवाळे, अरुण साळुंखे यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
आंदोलकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याचे सांगत, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची गरज व्यक्त केली.
मुसळधार पावसाची पर्वा न करता आंदोलकांनी धरणे आंदोलन सुरूच ठेवले असून, "लोकशाही वाचली पाहिजे", "विद्यार्थ्यांवरील अन्याय बंद करा" अशा जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी आग्रही मागणीही सर्व आंदोलनकर्त्यांनी केली आहे.