वाचन प्रसाराने चांगली माणसे घडतील : प्रा. डॉ. सुभाष वाघमारे

👤 बाळासाहेब कांबळे मायणी | 📅 20 July 2026 | 👁 125 Views
वाचन प्रसाराने चांगली माणसे घडतील  : प्रा. डॉ. सुभाष वाघमारे
विट्यात 'साहित्यवेल' वाचन प्रसार चळवळीचा प्रारंभ
आज समाजात व्यसनाधीनता, स्त्रियांवरील अत्याचार, , भ्रष्टाचार, जातीभेद, चोऱ्या, पेपरफुटी अशा अनेक समाजविघातक घटना वाढताना दिसत आहेत. या सर्वांच्या मुळाशी संस्कारांचा अभाव, आर्थिक व सामाजिक विषमता आणि सदाचरणापासून दूर गेलेली मानसिकता कारणीभूत आहे. शिक्षणाचा प्रसार होत असला तरी आदर्श नागरिक घडविण्यात आपण कमी पडत आहोत. चांगली माणसे घडविण्यासाठी प्रत्येक घरात विवेक, मानवता आणि समतेचे विचार देणारी पुस्तके पोहोचली पाहिजेत. लहानपणापासूनच मुलांमध्ये वाचनाची सवय रुजविणे ही काळाची गरज आहे. 'चांगली माणसे घडविण्यासाठी वाचन प्रसार जाणीवपूर्वक करूया,' असे आवाहन साहित्यवेल प्रकाशन, साताराचे प्रकाशक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले. ते भारतमाता ज्ञानपीठ संचलित सौ. विजयमाला पतंगराव कदम प्रशाला, विटा (जि. सांगली) येथे साहित्यवेल प्रकाशन, सातारा यांच्या 'साहित्यवेल वाचन प्रसार चळवळी'चा प्रेरणादायी प्रारंभ समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमात भारतमाता ज्ञानपीठाचे संस्थापक तथा ज्येष्ठ साहित्यिक रघुराज मेटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशालेच्या प्राचार्या वैशाली कोळेकर, उपशिक्षक सागर कचरे यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. डॉ. सुभाष वाघमारे पुढे म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील आदर्श वाचक विद्यार्थी असून संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेत. ग्रंथांचे सखोल वाचन करून त्यांनी विपुल ज्ञान संपादन केले आणि त्या ज्ञानाच्या बळावर स्वतःमध्ये, समाजात आणि देशात हितकारक व परिवर्तनशील बदल घडवून आणले. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने पाठ्यपुस्तकांबरोबरच अवांतर ग्रंथांचे नियमित वाचन करून ज्ञान, विवेक आणि सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे,."
यावेळी अनेक मूलभूत प्रश्नांवर विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली. वरद पाटील ,श्रावणी माने ,पियुष ढवळे ,काव्या भिंगारदिवे ,मुद्रा पवार ,वेदांत काळे या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे उत्तरे देत चर्चेत सहभाग नोंदविला. या संवादातून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, चिकित्सक विचार, संविधाननिष्ठा, वाचनाची आवड आणि सामाजिक भान विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक रघुराज मेटकरी यांनी आपल्या संस्थेच्या समृद्ध साहित्यिक परंपरेची माहिती दिली. प्रशालेतील विद्यार्थी दररोज ग्रंथालयातून अवांतर पुस्तके वाचतात, असे सांगून त्यांनी शाळेत दरवर्षी 'आदर्श वाचक पुरस्कार' दिला जात असल्याचे नमूद केले. विशेष म्हणजे हा पुरस्कार विद्यार्थ्याला न देता त्याच्या पालकांचा सत्कार करून कुटुंबात वाचन संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला जातो, असे त्यांनी सांगितले.
प्राचार्या वैशाली कोळेकर यांनी "वाचाल तर वाचाल" या उक्तीचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना सातत्याने ग्रंथवाचन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात विद्यार्थी वरद पाटील याने, "आदर्श नागरिक बनणे हेच शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे," असे मत व्यक्त केले, तर पियुष ढवळे याने "देश ज्या नीती, नियम आणि मूल्यांवर चालतो त्याला संविधान म्हणतात," अशी समर्पक व्याख्या करून उपस्थितांची दाद मिळवली.
या चळवळीत युवक-युवती, शिक्षक, पालक आणि समाजातील सर्व घटकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, प्रत्येक घरात दर्जेदार व विचारप्रवर्तक पुस्तके पोहोचवावीत, घराघरांत वाचन संस्कृती रुजविण्यासाठी जाणीवपूर्वक कार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. सूत्रसंचालन सागर कचरे यांनी केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |