यासंदर्भात सावंत यांनी अधीक्षक अभियंता मसाळ, सहाय्यक अधीक्षक अभियंता सूर्यवंशी व उपविभागीय अभियंता बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी तालुक्यातील पाणीस्थिती, म्हैसाळ योजनेची सद्यस्थिती आणि कृष्णा नदीतील अतिरिक्त पुराच्या पाण्याचे प्रभावी नियोजन याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
निवेदनात सावंत यांनी नमूद केले की, जत तालुक्यात दरवर्षी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. दुसरीकडे पावसाळ्यात कृष्णा नदीतील लाखो घनमीटर अतिरिक्त पाणी इतर राज्यात किंवा समुद्राकडे वाहून जाते. या पाण्याचा योग्य वापर करून ते म्हैसाळ योजनेद्वारे जत तालुक्यातील जलसाठ्यांमध्ये सोडल्यास भूजल पातळी वाढेल, विहिरी व बोअरवेलचे पुनर्भरण होईल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल आणि शेतकऱ्यांना वर्षभर सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल.
तलाव आणि बंधारे भरल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कमी होईल, शेतीचे उत्पादन वाढेल आणि भविष्यातील दुष्काळाची तीव्रताही कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे उपलब्ध अतिरिक्त पाण्याचा 'प्रत्येक थेंब जतच्या विकासासाठी' वापरणे ही काळाची गरज असल्याचे सावंत यांनी अधोरेखित केले.
"शासनाने ही मागणी तातडीने मान्य करून कृष्णेच्या पुराचे अतिरिक्त पाणी जत तालुक्याकडे वळविल्यास पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय होईल, शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळेल."
-विक्रमसिंह सावंत
यासाठी कोसारी, बिरनाळ, मिरवाड, डफळापूर, बेळूंखी, प्रतापूर, वाळेखिंडी, तिप्पेहळळी, शेगाव (१ व २), सनमडी, येळवी, रेवनाळ, साळमळगेवाडी, बिळूर (अरवक्की व केसराळ तलाव), देवनाळ, मेंढीगिरी, उंटवाडी, वळसंग, शेड्याळ, दरीकोनूर, उटगी, दोड्डानाला, सिद्धनाथ, मुचंडी, पाच्छापूर आदी गावांतील सर्व तलाव, बंधारे आणि जलसाठे पावसाळ्यात भरून घेण्यासाठी तातडीने नियोजन करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी विक्रमसिंह सावंत यांनी विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामाचा आढावाही घेतला. जत तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शिवारापर्यंत पाणी पोहोचावे, तसेच विस्तारित म्हैसाळ योजनेद्वारे तालुक्यातील सर्व तलाव, बंधारे आणि जलसाठे नियमितपणे भरले जावेत, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
निवेदनाची दखल घेत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन उपलब्ध अतिरिक्त पाण्याचे नियोजन करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सावंत यांनी दिली.
"शासनाने ही मागणी तातडीने मान्य करून कृष्णेच्या पुराचे अतिरिक्त पाणी जत तालुक्याकडे वळविल्यास पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय होईल, शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळेल," असा विश्वास विक्रमसिंह सावंत यांनी व्यक्त केला.