ईश्वरपूर शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या ईश्वरपूर पोलीस ठाणे गोपनीय शाखेतील कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान सोहळा नुकताच पार पडला.गोपनीय शाखेचे कर्मचारी हे पोलीस दलाचे "डोळे आणि कान" म्हणून ओळखले जातात. अवैध धंदे, चोरी, दरोडे आणि इतर गुन्ह्यांची गोपनीय माहिती गोळा करून ती वरिष्ठांना देण्याचे महत्वाचे काम ते करतात.
गेल्या काही महिन्यात त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अनेक गुन्हे उघडकीस आले. तसेच शहरातील महत्वाचे सण-उत्सव आणि कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरले. या कामगिरीची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात गोपनीय शाखेतील विशाल पांगे, दीपक घस्ते, अमोल सावंत, श्रीकांत शिंदे, तसेच पोलीस निरीक्षक संदीप पाटील आदींचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक तुषार जोशी म्हणाले की , "गोपनीय शाखेच्या माहितीशिवाय कुठलाही मोठा गुन्हा उघड होऊ शकत नाही. त्यांचे काम पडद्यामागे असले तरी त्याचा परिणाम थेट नागरिकांच्या सुरक्षिततेवर होतो. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देणे आमचे कर्तव्य आहे."
यापुढेही त्याच निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करत राहून ईश्वरपूर शहर गुन्हेमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.कार्यक्रमाला पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते.