२५ हजार कामगारांसह ‘घरकुल दिंडी’ मंत्रालयावर धडकणार – कॉम्रेड आडम मास्तर

👤 अतुल फसाले | 📅 16 June 2026 | 👁 194 Views
२५ हजार कामगारांसह ‘घरकुल दिंडी’ मंत्रालयावर धडकणार – कॉम्रेड आडम मास्तर
सोलापूर, दि. १५ : विडी कामगारांना महाराष्ट्र शासनाने अधिसूचित केलेले प्रतिदिन ४०२ रुपये किमान वेतन तात्काळ लागू करावे, कामगारांवर दबाव टाकून संमतीपत्रे घेण्याचे प्रकार थांबवावेत तसेच कॉ. गोदुताई परुळेकर नगर व रे नगर येथील नागरिकांच्या मूलभूत सुविधांचे प्रश्न सोडवावेत, या मागण्यांसाठी २ ऑक्टोबर २०२६ रोजी सोलापूर ते मुंबई मंत्रालयावर २५ हजार कामगारांसह भव्य ‘घरकुल दिंडी’ काढण्यात येईल, अशी घोषणा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी केली.

सिटू संलग्न लाल बावटा विडी कामगार युनियनच्या वतीने सोमवार (दि. १५) रोजी कॉ. नरसय्या आडम (मास्तर) व सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर सहायक कामगार आयुक्त मंगेश झोले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना कॉ. आडम म्हणाले की, अनेक विडी कारखानदार कामगारांवर शासनाचे किमान वेतन नाकारण्यासाठी दबाव टाकत असून जबरदस्तीने संमतीपत्रे घेण्याचे प्रकार सुरू आहेत. ही कृती कामगारांच्या वैधानिक हक्कांवर गदा आणणारी असून ती तात्काळ थांबविणे आवश्यक आहे.

कॉ. एम.एच. शेख यांनी सांगितले की, विडी कामगारांना किमान वेतन मिळावे यासाठी लाल बावटा विडी कामगार युनियन गेली २९ वर्षे संघर्ष करत आहे. शासनाने २०१४ मध्ये किमान वेतन अधिसूचित केले असले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

निवेदनातील प्रमुख मागण्या म्हणजे सर्व विडी उद्योगांची तात्काळ तपासणी करून कामगारांवरील दबाव थांबविणे, जबरदस्तीने घेतलेली संमतीपत्रे कायदेशीरदृष्ट्या अमान्य घोषित करणे, प्रतिदिन ४०२ रुपये किमान वेतनाची प्रभावी अंमलबजावणी करणे, दोषी कारखानदारांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करणे, दबाव किंवा भेदभाव करणाऱ्यांविरुद्ध कठोर निर्देश जारी करणे तसेच विशेष चौकशी मोहीम राबवून अहवाल सार्वजनिक करणे या होत्या.

या आंदोलनात सिटूचे राज्य उपाध्यक्ष युसुफ शेख (मेजर), नसीमा शेख, ॲड. अनिल वासम, दत्ता चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने विडी कामगार सहभागी झाले होते. आंदोलनाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा कोषाध्यक्ष दीपक निकंबे, विल्यम ससाणे, बापू साबळे, विक्रम कलबुर्गी, वसीम मुल्ला,रफिक काझी, आप्पाशा चांगले, बालाजी तुम्मा, वसीम देशमुख, हसन शेख, वीरेंद्र पद्मा, नरेश दुगाने, नरसिंग बुगले, मल्लेशम कारमपुरी, नरेश गुल्लापल्ली, चंटी बिटला, योगेश आकिम, दिनेश बडगु, बालाजी गुंडे, शिवा श्रीराम, बालकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, राधागोपाल बंडी, प्रकाश कुऱ्हाडकर, श्रीनिवास तंगडगी आणि प्रशांत विटे, आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |