अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातील मेडिकल मधील औषधांच्या बाबतीतही जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन डॉक्टरांची सक्ती स्वतःच्याच दवाखान्याच्या मेडिकल मधून औषधे घेतली पाहिजे या सक्तीच्या विरोधात निर्णय घेतला की यापुढे डॉक्टर ना अशी सक्ती करता येणार नाही व ठराविकच कंपनीची,ब्रँडची चे औषधी घ्या असेही त्यांना लिहिता येणार नाही. तंबाखूजन्य घटक अर्थातच गुटखा तसेच अन्न -पदार्थाशी निगडित भेसळ करणाऱ्या माफियांमध्ये अक्षरशः दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दूध, डेअरी उत्पादने, बेकरी पदार्थ, खाद्यतेल यामधील भेसळ रोखण्यासाठी त्यांनी राज्यभर सुरू केलेल्या धडक मोहिमेने भ्रष्ट व्यवस्थेला हादरे दिले आहेत. या कारवाईचा विशेष परिणाम तासगाव तालुक्यातही उमटताना दिसत आहे.
'भेसळमुक्त' मोहिमेचा परिणाम: बाजारपेठेतून गायब झाले संशयास्पद पनीर
आयुक्त मुंढे यांच्या कठोर कारवाईनंतर बाजारपेठेत मोठा बदल दिसून येत आहे. दुधाच्या विक्रीत झालेली घट आणि तासगावच्या बाजारपेठेतून अचानक पनीर गायब होणे, यावरून आपण आजवर नक्की काय खात होतो, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. आता कारवाईच्या भीतीने ही भेसळयुक्त उत्पादने बाजारातून गायब झाल्याने, 'याआधी आम्ही अन्न खात होतो की विष?' असा सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत.
तासगाव शहरासह तालुक्यातील अनेक पान टपऱ्या बंद.
तासगाव शहरासह तालुक्यामध्ये सर्वत्र सहज मिळणारा मावा -गुटखा जवळजवळ मिळेनासा झाला आहे, तर अद्याप काही ठिकाणी लपून-छपून विक्री होताना दिसून येत आहे त्यावरही प्रभावीपणे कारवाई होणे गरजेचे आहे असे नागरिकांच्यातून बोलले जाते.
२१ वर्षांत २५ बदल्या: भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घातल्याची शिक्षा?
तुकाराम मुंढे यांची प्रशासकीय कारकीर्द ही त्यांच्या शिस्तबद्ध आणि धडाकेबाज कार्यपद्धतीसाठी ओळखली जाते. गेल्या २१ वर्षांच्या सेवेमध्ये त्यांच्या तब्बल २५ वेळा बदल्या झाल्या आहेत. मुंढे ज्या ज्या खात्यात जातात, तिथे भ्रष्टाचार मुळापासून संपवण्याचा आणि अवैध कामे बंद करण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करतात. मात्र, त्यांची ही पारदर्शकता आणि 'झिरो टॉलरन्स' धोरण नेहमीच सत्ताधारी आणि राज्यकर्त्यांना खटकत आले आहे. याच कारणामुळे त्यांना वारंवार बदलीच्या शिक्षेला सामोरे जावे लागते, असा स्पष्ट आरोप आता जनसामान्यांतून होत आहे.
बदली होणार का? नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
मुंढे यांनी अवघ्या काही दिवसांत राज्यभरात जी धडक कारवाई सुरू केली आहे, त्यामुळे भ्रष्ट माफियांना घाम फुटला आहे. परंतु, त्यांचा इतिहास पाहता, आताही हीच परिस्थिती उद्भवणार का? त्यांना याही वेळी राजकीय दबावामुळे बदलीला सामोरे जावे लागणार का? असा तीव्र प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. पारदर्शक आणि कार्यक्षम अधिकारी राज्यकर्त्यांना नको आहेत का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
प्रशासकीय निष्क्रीयतेवर नागरिकांचा रोष
एका महिन्याच्या आत एवढा मोठा बदल घडून येतो, तर यापूर्वीच्या प्रशासनाने नेमके काय केले? असा तिखट सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. अनेक नागरिकांचे असे मत आहे की, "जर तुकाराम मुंढे यांच्यासारखा कार्यक्षम अधिकारी राज्याचे नेतृत्व करू शकला, तर महाराष्ट्रात नक्कीच क्रांतिकारक बदल घडतील."
नागरिकांची मागणी: 'मुंढे यांना काम करू द्या'
तासगावच्या गल्लीबोळातील चर्चेत आज तुकाराम मुंढे यांच्या कारवायांचीच चर्चा आहे. आरोग्यदायी महाराष्ट्र घडवण्यासाठी मुंढे यांना मुक्तहस्त द्यावा आणि त्यांची बदली न करता त्यांना त्यांचे काम पूर्ण करू द्यावे, हीच आता महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य नागरिकाची मायबाप सरकारकडे आग्रही मागणी आहे.