कुणकेश्वरच्या वाळू माफियांना ग्रामस्थांचा दणका

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 12 June 2026 | 👁 190 Views
कुणकेश्वरच्या वाळू माफियांना ग्रामस्थांचा दणका
श्री क्षेत्र कुणकेश्वर समुद्रकिनारी सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत दोन मॅक्स वाहने पकडून थेट देवगड तहसील कार्यालय गाठत महसूल प्रशासनाला जाब विचारला. गुरुवारी रात्री ग्रामस्थांनी धाडसी कारवाई करत वाळू वाहतूक करणारी दोन वाहने ताब्यात घेतल्यानंतर शुक्रवारी सकाळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ तहसील कार्यालयात दाखल झाले. यावेळी संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

गुरुवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास कुणकेश्वर वरचीवाडी परिसरातील ग्रामस्थांनी समुद्रकिनारी सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपशाच्या प्रकाराला तीव्र विरोध दर्शवत घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी संबंधितांना जाब विचारत दोन मॅक्स गाड्या ताब्यात घेतल्या. या कारवाईमुळे वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून काही जणांनी घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती मिळाली.

शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांनी पकडलेल्या दोन्ही गाड्या महसूल प्रशासनाच्या ताब्यात देण्यासाठी देवगड तहसील कार्यालयात आणल्या. यावेळी नायब तहसीलदारांची भेट घेऊन ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. "वारंवार तक्रारी करूनही अवैध वाळू उपशाकडे दुर्लक्ष का केले जाते?" असा सवाल उपस्थित करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
यावेळी नायब तहसीलदारांनी ग्रामस्थांना आश्वस्त करत, "पकडून दिलेल्या वाहनांबाबत कायदेशीर चौकशी करून नियमानुसार कारवाई केली जाईल. यापुढे असे प्रकार होणार नाहीत यासाठी प्रशासन आवश्यक ती पावले उचलेल," असे सांगितले.

आजस्थितीत कुणकेश्वर समुद्रकिनारी विहिरीसारखे मोठमोठे खड्डे करून दिवसाढवळ्या वाळू उपसा केला जात आहे. या प्रकारावर कोणाचाही अंकुश नसल्याने राजरोसपणे वाळूची वाहतूक होत असल्याचा आरोप करण्यात आला. समुद्रकिनारी सुरू असलेल्या या बेसुमार वाळू उपशामुळे किनाऱ्यालगतच्या वस्तींना भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. तसेच मच्छीमारांच्या होड्या ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेडलाही याचा फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
"आज प्रशासनाने आम्हाला सहकार्य केले आहे. मात्र भविष्यातही असे प्रकार सुरू राहिले आणि प्रशासनाने कारवाई केली नाही तर ग्रामस्थांवर नाईलाजास्तव कायदा हातात घेण्याची वेळ येईल. प्रशासनाला दिलेला हा आमचा शेवटचा इशारा समजावा," अशी तीव्र भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात देवस्थान ट्रस्टचे सचिव हेमंत वातकर यांनीही प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "अवैध वाळू उपसा हा आजचा विषय नाही. वर्षानुवर्षे हा प्रकार सुरू असून प्रशासनाचे त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. कुणकेश्वर हे धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात. मात्र समुद्रकिनाऱ्याची होणारी धूप आणि वाळू उपशामुळे भविष्यात पर्यटनस्थळालाच धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ग्रामस्थांना ही भूमिका घ्यावी लागली."
घटनेच्या वेळी देवस्थान ट्रस्टचे सचिव हेमंत वातकर, अभय पेडणेकर, वरचीवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सुहास नानेरकर,निखिल कुणकेश्वरकर, गणेश कुणकेश्वरकर ,सुहास वातकर, दीपक घाडी, ओंकार घाडी, केतन साटम, अनिकेत साईम, किरण गोईम यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे कर्मचारी, तलाठी तसेच कुणकेश्वरचे सरपंच यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
महसूल प्रशासनाच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या वाहनांचे मालक प्रदीप प्रकाश चव्हाण आणि दत्तप्रसाद आचरेकर असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही जप्त करण्यात आलेल्या वाहनातील वाळू साधारण एक ब्रास अशी एकूण दोन गाड्यांची दोन ब्रास वाळू व वाहने जप्त केली आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |