मोगराळे आणि शिंगणापूर सह माण तालुक्यातील सर्वच परिसरातील अघोषित आणि अनियंत्रित वीज भारनियमन (लोडशेडिंग) तात्काळ बंद करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या (रासप) वतीने दहिवडी येथील उपविभागीय महावितरण कार्यालयासमोर तीव्र 'घंटानाद आंदोलन' करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शरद दडस यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोगराळे आणि शिंगणापूर परिसर व माण तालुक्यातील इतर ठिकाणी वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने शेतकरी, व्यापारी, दूध उत्पादक पशुपालक, महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सामान्य नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. ऐन गरजेच्यावेळी वीज गायब होत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे, तसेच घरगुती ग्राहकांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. महावितरणच्या या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. ऊर्जामंत्री यांना पत्र देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. नागरिकांच्या मूलभूत सुविधाकडे दुर्लक्ष केले जात आहे. गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि झोपलेल्या महावितरण अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाला आता आंदोलनाचे हत्यार उपसन्याशिवाय पर्याय नाही. मोगराळे, शिंगणापूर तसेच माण तालुक्यातील भारनियमन तातडीने थांबवले नाही, तर दहिवडी येथील उपविभागीय कार्यालयावर दिनांक १५ जून २०२६ रोजी घंटानाद करून प्रशासनाचा निषेध केला जाईल, असा इशारा शरद दडस यांनी दिला आहे. या आंदोलनात परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.