लातूरमध्ये 'ती' बैलाच्या जागी स्वतः जुंपली नांगराला! काळजाचा थरकाप उडवणारी विदारक वास्तवता

👤 विशेष प्रतिनिधी / लातूर | 📅 11 June 2026 | 👁 272 Views
लातूरमध्ये 'ती' बैलाच्या जागी स्वतः जुंपली नांगराला! काळजाचा थरकाप उडवणारी विदारक वास्तवता
लातूर (देवणी):
आज आपण २१ व्या शतकातील 'विकसनशील भारत', 'डिजिटल इंडिया' आणि 'जागतिक महासत्ता' होण्याच्या मोठ्या-मोठ्या गप्पा मारत आहोत. चंद्रावर आणि सूर्यावर झेप घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आपल्या देशात, जगाचं पोट भरणाऱ्या अन्नदात्यावर आजही जनावरासारखं राबण्याची वेळ यावी, यासारखं दुसरं मोठं दुर्दैव नाही. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी बुद्रुक येथून समोर आलेले एक चित्र संपूर्ण देशाच्या आणि व्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारे आहे. एका गरीब शेतकऱ्याचा बैल वीज पडून दगावल्याने, गरिबीच्या गर्तेत अडकलेल्या त्याच्या हतबल पत्नीला शेतीसाठी स्वतःच्या खांद्यावर नांगराचे जू घ्यावे लागले आहे. हे विदारक वास्तव पाहून "आपण खरंच महासत्ता होणार का?" असा संतप्त आणि आर्त सवाल आज प्रत्येक सुजाण नागरिक विचारत आहे.
​ऐन पेरणीच्या तोंडावर निसर्गाचा क्रूर घाला
​मिळालेल्या माहितीनुसार, बोंबळी गावातील गरीब शेतकरी काशिनाथ पुंडलिक गायकवाड यांनी अत्यंत कष्टाने, बटईने जमीन घेऊन आपल्या संसाराचा गाडा हाकला आहे. खरीप हंगामाची पेरणी वेळेत व्हावी म्हणून त्यांनी मोठ्या आशेने बैलजोडी तयार ठेवली होती. मात्र, ५ जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसात अचानक त्यांच्या शेतात वीज कोसळली. या दुर्दैवी घटनेत त्यांच्या कुटुंबाचा मुख्य आधार असलेला बैल जोडी पैकी एक बैल जागीच दगावला. आधीच कर्जाच्या आणि गरिबीच्या ओझ्याखाली दबलेल्या काशिनाथ यांच्यावर जणू आभाळच फाटले.
​नवीन बैल खरेदीची ऐपत नाही; म्हणून फाटक्या प्रपंचाला आधार म्हणून काशिनाथ यांच्या पत्नीने स्वतःलाच जुंपले!
​मृग नक्षत्र लागल्यामुळे सगळीकडे पेरणीची लगबग सुरू आहे. शेतीची मशागत वेळेत झाली नाही, तर वर्षभराच्या खाण्याचा प्रश्न निर्माण होईल, या भीतीने गायकवाड कुटुंब पुरते हादरले होते. सरकारी पंचनामे आणि मदतीची प्रतीक्षा करण्याइतका वेळ हाताशी नव्हता, अन् नवीन बैल खरेदी करण्यासाठी खिशात दमडीही नव्हती.
​अशा अत्यंत असहाय्य आणि बिकट परिस्थितीत काशिनाथ यांच्या पत्नी सौ. हौसाबाई गायकवाड यांनी जे पाऊल उचलले, ते पाहून आज पाहणाऱ्याच्या काळजाचे पाणी होत आहे. पतीला शेतीत एकटे सोडू शकत नाही आणि गरिबीपुढे हात टेकू शकत नाही, म्हणून त्या माऊलीने स्वतःच बैलाची जागा घेतली. एका बाजूला उरलेला एक मूक प्राणी आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या खांद्यावर नांगराचे जड लाकडी जू वाहणारी एक स्त्री... हे चित्र केवळ एका कुटुंबाचे नाही, तर आपल्या व्यवस्थेच्या अपयशाचे जिवंत स्मारक आहे.
​हाच का आमचा महासत्ताक भारत?
​हा हृदयद्रावक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, प्रत्येक नागरिकाच्या मनाला चटके लावत आहे. इंटरनेटवर हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप आणि तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
​बुलेट ट्रेन, अलिशान हायवे आणि गगनचुंबी इमारतींच्या झगमगाटात या गरीब शेतकऱ्याचा अंधार कोणाला का दिसणार की शासकीय प्रशासकीय यंत्रणा झोपेचं सोंग घेणार ?

​एकीकडे अब्जावधी रुपयांच्या जाहिराती करून 'शेतकरी राजा' सुखी असल्याचा दावा मायबाप सरकारकडून केला जातो, मग प्रत्यक्षात एका महिलेला जनावरासारखे शेतात का राबावे लागत आहे?
​सरकारी मदतीचे कागदी घोडे नाचवण्यात महिने महिने निघून जातात, पण या माऊलीच्या खांद्यावरील जखमांचे आणि तिच्या स्वाभिमानाचे काय?
​आता तरी प्रशासनाला पाझर फुटणार का?
​राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी वातानुकूलित दालनात बसून जगाच्या पोशिंदाचे शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या योजना आखतात. मात्र, जमिनीवरचे वास्तव काय आहे, हे या घटनेने दाखवून दिले आहे. हा व्हिडिओ केवळ पाहण्यासाठी किंवा हळहळ व्यक्त करण्यासाठी नाही, तर सुस्त व्यवस्थेला जाब विचारणारा आहे.
​स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन गायकवाड कुटुंबाला तात्काळ नवीन बैलजोडी किंवा भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. या हतबल माऊलीच्या खांद्यावरील ते जड जू लवकरात लवकर उतरवून तिला न्याय दिला जावा, हीच आता संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |